Rahul Gandhi Veer Savarkar Controversy
Rahul Gandhi Veer Savarkar Controversy  sarkarnama
पुणे

Shiv Sena : भाजपच्या नागोबांना बिळाबाहेर पडण्याची संधी राहुल गांधी वारंवार का देतात ?

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi Veer Savarkar Controversy : वीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन वाद पेटला आहे. या वादावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानावरुन महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असे काल (शुक्रवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. (Rahul Gandhi Veer Savarkar Controversy news update)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज (शनिवारी) सावरकरांवरून सध्या चाललेल्या वादावर भाष्य केलं आहे. भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल करीत अग्रलेखातून नेत्यांचे कान टोचले आहेत.

"राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

"वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस –मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात, पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील," असे खडे बोल शिवसेनेने सुनावले आहेत

'सामना'च्या अग्रलेखात काय म्हटलं आहे...

  • गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय?

  • वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता.

  • देशातील नफरत, द्वेषाचे पसरत चाललेले जहर, महागाई, बेरोजगारी या मुद्दय़ांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण 15 किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात जनता चालत असते.

  • राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे.

  • भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT