Umesh Sonawane-Santosh Jagtap  Sarkarnama
पुणे

संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

आरोपी उरुळी कांचन येथील गुंड आप्पा लोंढे टोळीचा विरोधक व आप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव यांचे निकटवर्तीय आहेत.

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (जि. पुणे) : वाळू व्यावसायिक संतोष संपत जगताप खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उमेश सोपान सोनवणे (वय ३६, रा. राहू, ता. दौंड) याला लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९ ऑक्टोबर) रात्री उशिरा अटक केली. उमेश सोनवणे याला शनिवारी (ता. ३० ऑक्टोबर) न्यायालयात हजार केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी ही माहिती दिली. (Umesh Sonawane arrested in Santosh Jagtap murder case)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील सोनाई हॉटेलमध्ये संतोष जगताप हा आठ दिवसांपूर्वी जेवणासाठी थांबला होता. त्यावेळी पवन मिसाळ, महादेव आदलिंगे व स्वागत खैरे यांनी गोळ्या घालून त्याचा खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी ता. २४ ऑक्टोबर रोजी पवन मिसाळ, महादेव आदलिंगे यांना इंदापूर येथून अटक केली होती. दोन्ही आरोपींकडे केलेल्या चौकशीत उमेश सोनवणे हाच संतोष जगताप याच्या खुनाचा मास्टर माईंड असल्याचे निष्पन्न झाल्याने लोणी काळभोर पोलिसांनी उमेश सोनवणे याला शुक्रवारी रात्री अटक केली.

लोणी काळभोर पोलिसांनी यापूर्वी पवन गोरख मिसाळ (वय २९, धंदा- खडी सप्लायर, रा. दत्तवाडी, उरळी कांचन), महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६, धंदा-शेती, रा. जुनी तांबे वस्ती, दत्तवाडी, उरूळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी स्वागत बाप्पू खैरे ( वय २५, रा. दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली) हा संतोष जगतापच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात उरुळी कांचन येथे जागीच ठार झाला होता. आता उमेश सोनवणे याच्या अटकेमुळे संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोचली आहे.

संतोष जगताप गोळीबार प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेले आरोपी पवन मिसाळ, महादेव आदलिंगे हे दोन्ही आरोपी उरुळी कांचन येथील गुंड आप्पा लोंढे टोळीचा विरोधक व आप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव यांचे निकटवर्तीय असल्याने लोणी काळभोर पोलिस विष्णू जाधव याचाही हात या प्रकरणात असल्याचे पुरावे शोधत आहेत.

दरम्यान, संतोष जगताप हत्या प्रकरणात पाटस परिसरातील एका व्यक्तीचा मुख्य सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस त्या दिशेने शोध घेत आहेत. मात्र, संतोष जगताप हत्येनंतर मात्र पाटस येथील ती व्यक्ती फरार झाल्याने पोलिस यंत्रणा संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT