Nirmala Sitharaman  Sarkarnama
पुणे

भाजपचे टार्गेट बारामतीच : निर्मला सीतारामन मतदारसंघात तीन दिवस तळ ठोकणार...

बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे

मिलिंद संगई

बारामती : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अवधी असला तरी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. देशातील काही मतदारसंघ निवडून त्याची जबाबदारी नेत्यांवर देण्यात आली आहे. पवारांचा (Pawar) बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Union Finance Minister Nirmala Sitharaman is in charge of Baramati Lok Sabha Constituency)

दरम्यान, भाजप श्रेष्ठींकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवताच सीतारामन ह्याही कामाला लागल्या आहेत. त्यांनी या मतदारसंघाची दौरा जाहीर केला असून त्या येत्या १६ ते १८ ऑगस्टदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेणार आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या दौऱ्याबाबतची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत बैठक घेऊन सीतारामन यांच्या दौऱ्याची तयारी करणार आहेत. बैठकीसाठी राम शिंदे, राहुल कुल, गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, जालिंदर कामठे, भीमराव तापकीर, शरद ढमाले, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके आदी भाजपचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण ह्या १६ ऑगस्ट रोजी खडकवासला व भोर, ता. १७ रोजी इंदापूर व दौंड, तर १८ ऑगस्ट रोजी बारामती व सासवड येथे येणार आहेत. बारामती आणि सासवड येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

भाजपला जे लोकसभा मतदारसंघ अद्याप जिंकता आलेले नाहीत. अशा मतदारसंघाची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे देण्यात आली आहे. त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून आगामी निवडणुकीत ते मतदारसंघ जिंकायचे, असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीमधील तयारीकडे पाहिले जाते. त्यादृष्टीने भाजपनेही तयारी सुरू केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या दोन निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजय मिळविला आहे. पवारांचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत करुन तो जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. आता त्या बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासोबतच केंद्रीय प्रकल्पांना भेटी देणे, केंद्राच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा करणे, या गोष्टींना चालना देणार आहेत. त्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासह ही जागा खेचून आणण्यासाठी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT