Soham Mandhare
Soham Mandhare Sarkarnama
पुणे

UPSC Result 2023 : 'एमआयडीसी'त काम करण्याचा विचार करणारा सोहम बनणार 'आयएएस'

सरकारनामा ब्यूरो

UPSC Civil Services Exam Result 2022 : अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर बारामती 'एमआयडीसी'तील एखाद्या कंपनीत नोकरी करण्याचा विचार होता. दरम्यान, खासगी आणि सरकारी नोकरीची तुलना केली, तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तीन-चार वर्षे देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळाले नसले तरी चांगले गुण मिळात होते. तिसऱ्या प्रयत्नात निवड झाली.आता चौथ्या प्रयत्नात 'आयएएस' होण्याचे स्वप्न साकार होतेय, असे सोहम मांढरे याने सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. यात पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात असलेल्या पडवी गावातील सोहम मांढरे याने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या यशाचा प्रवास त्याने 'सरकारनामा'शी बोलताना उलगडला.

सोहमचे वडील शेतकरी असून आई प्राथमिक शिक्षिका आहे. त्याने पडवीतूनच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालातून त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विद्याप्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. (UPSC Civil Services Exam Result)

पदवी घेतल्यानंतर बारामती (Baramati) 'एमआयडीसी'त काम करण्याचा विचार असल्याचे सोहमने सांगितले. तो म्हणाला, "अभियांत्रिकीची पदवी चांगल्या गुणांनी घेतल्यानंतर 'एमआयडीसी'तील कंपनीत काम करण्याचा विचार होता. दरम्यान, मित्र आणि शिक्षकांशी बोलल्यानंतर खासगी आणि शासकीय नोकरीतील फरक जाणविला. अधिकारी होऊन विविध स्तरावर लोकांची सेवा करता येईल, असा विचार केला. त्यातूनच नोकरी न करता स्पर्धा परीक्षेला काही वेळ देण्याचा निर्णय घेतला."

'यूपीएससी' परीक्षेची तयारी करण्याचे ठरविल्यानंतर एक वर्षे पुण्यात खासगी क्लास केले. त्यानंतर मात्र घरीच अभ्यास केल्याचे सोहमने सांगितले. तो म्हणाला, "२०१७ मध्ये पदवी घेतल्यानंतर २०१८ ला परीक्षेची तयारी सुरू केली. पहिला प्रयत्न २०१९ ला दिला. त्यानंतर २०२० मध्ये दुसरा प्रयत्न दिला. या दोन्ही प्रयत्नात यश मिळाले नसले तरी आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर २०२१ च्या तिसऱ्या प्रयत्नात २६७ रँक मिळवून 'आयआरएस' झालो. मात्र 'आयएएस' होण्यासाठी चौथ्यावेळी २०२२ ला प्रयत्न केला. आता २१८ वी रँक आली आहे." (UPSC Result Update)

सोहमने सांगितले की, "यावेळी रँक दोन अंकात येईल, अशी आशा होती. मात्र मुलाखातीत कमी गुण पडले असतील. माझे प्राधान्य क्रम 'आयएएस' आणि 'आयपीएस' आहेत. त्यातील एक पद आता नक्की मिळणार असल्याचे सर्वजण आनंदीत आहेत." यावेळी सोहमने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचा सल्ला दिला आहे.

तो म्हणाला, "स्पर्धा परीक्षेची तयारी फक्त पुस्तके वाचून होत नाही. दरम्यान, आपल्या व्यक्तिमत्व विकासावर मोठ्या प्रमाणात काम करणे गरजेचे असते. त्यातूनच उतीर्ण होण्याची शक्यता वाढते. त्याचा फायदा पुढे नोकरी करतानाही होतो. तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांची तुलना करून स्पर्धा परीक्षा करायची की नाही, याचाही विचार करावा."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT