Pune News Sarkarnama
पुणे

Pune News: नेत्यांनो, स्मशानभूमीत लोकांच्या भावनांशी खेळायचं बंद करा!

सरकारनामा ब्यूरो

Pune News: दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते, भाषणबाजी करीत एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते. दशक्रिया विधीला उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक, मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे नातेवाईक, कुटुंब अक्षरशः या भाषणबाजीला कंटाळले आहेत. हे चित्र सर्रास पाहायला मिळते. या भाषणबाजीला कंटाळून उरुळी कांचन (पुणे) येथील ग्रामस्थांकडून स्मशानभूमी परिसरात भाषण बाजीबंद करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

राजकीय नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता स्मशानभूमीत भाषण करीत असतात. उपस्थित असलेले खाली बसून त्यांची टिंगल-टवाळी करीत असतात. खाली बसलेले वेगळ्याच गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. त्यामध्ये कोण कुणाचे ऐकतो, हेच कळत नाही.

दशक्रिया विधी कार्यक्रमात एक-दोन राजकीय व्यक्तींनी प्रतिनिधी स्वरूपात बोलणे उचित आहे. परंतु, अगदी दहा ते बारा जण बोलतात. ही भाषणबाजी कंटाळा आणणारी असते. त्यामुळे उपस्थित, मृत व्यक्तीचे कुटुंब, नातेवाईक अक्षरशः कंटाळतात. नागरिकही घाईत दशक्रिया विधी उरकतात.

भाषणबाजीबाबत दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. त्यामुळे दशक्रिया विधी म्हटलं की, ती राजकीय नेत्यांची सभास्थळे झालीत का? हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

पूर्व हवेलीसह परिसरात दशक्रिया विधीचे कार्यक्रम म्हणजे राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेली आहेत, असे पाहावयास मिळते. दशक्रिया विधी कोणाचाही असला, तर त्या कुटुंबाचे, मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सांत्वन करण्याऐवजी राजकीय नेत्यांची भाषणे लांबलचक, रटाळवाणी होत आहेत.

"मयत व दहावा हा त्या कुटुंबांसह नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. सर्वांनी श्रद्धांजली वाहून राजकीय फायदा घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे. उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठाने श्रद्धांजली वाहून शेवट करत लोकांच्या भावनेशी खेळायचे बंद करावे. मयत आणि दहाव्यामधील भाषणे राजकीय पुढाऱ्यांनी बंद करून लोकांना सहकार्य करा," असे बॅनर लिहिण्यात आले आहे. त्याखाली समस्त उरुळी कांचन ग्रामस्थ, असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT