Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More News : वसंत मोरेंनी सांगितलं जरांगे पाटलांच्या भेटीत नेमकं काय झालं?, म्हणाले...

Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंनी शनिवारी जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली गाठली.

Sudesh Mitkar

Pune Lok Sabha Constituency News: लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा चंग बांधलेले वसंत मोरे शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीमध्ये वसंत मोरे यांनी मराठा समाजाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे व्यक्त केली असून, शंभर टक्के आपल्या उमेदवारीचा विचार जरांगे पाटील करतील, असा विश्वासदेखील वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

मनसेमधून लोकसभा निवडणूक आपल्याला लढवता येणार नाही, याची कल्पना आल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर वसंत मोरे यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळात त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

मात्र, वसंत मोरे यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर वसंत मोरे(Vasant More) यांनी अजून दुसरा पर्यायांचा विचार करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही शुक्रवारी मुंबई येथे भेट घेतली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी, अथवा पाठिंबा द्यावा, अशी मागणी या बैठकीत वसंत मोरे यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांची भेट घेतल्यानंतर आज वसंत मोरे यांनी थेट अंतरवाली सराटी गाठली. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुणे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील लोकसंख्येच्या आकडेवारीचा आणि मतदानाचा कागद सुपूर्त करत, सध्याची लोकसभेची पुण्यातील गणितं सांगितली.

या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोरे म्हणाले, जरांगे यांची भेट झाली असली तरी सविस्तर चर्चा झालेली नाही. या भेटीमध्ये पुण्यामधील मतदान कशा प्रकारचे आहे. याबाबत त्यांना संपूर्ण सविस्तर माहितीचा कागद दिला आहे. काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जी सविस्तर माहिती दिली तीच माहिती जरांगे पाटील यांना दिली आहे.

मोरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यापासूनच मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे स्पष्ट केले आहे. त्याच दृष्टिकोनातून काल प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून, आज जरांगे यांच्या भेटीला आलो आहे. मराठा समाजाचा मी पुण्यातून अपक्ष उमेदवार असणार आहे. सकल मराठा समाजाचे काम मी पूर्वीपासून करत आहे. सकल मराठा समाजाचा मी पाईक असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढायला तयार असल्याचं मोरे यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांना फाइल देण्यात आलेली आहे. या फाइलमध्ये संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये माझेदेखील नाव आहे. तसेच इतर तीन-चार जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील हे माझ्या उमेदवारीचा शंभर टक्के विचार करतील, असा विश्वास वसंत मोरे यांनी या वेळी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT