Pune News, 10 Sep : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि साउंड सिस्टिमच्या वापराला विरोध करत आपल्या भूमिकेमुळे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या मुलाखतीतील काही वक्तव्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत.
या वक्तव्यांवरून आता बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी बापट यांनी कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्ये केल्याचा दावा या नोटीसमधून करण्यात आला आहे.
नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी ॲड. प्रदीप नाईक यांनी केली आहे. तसेच या मुदतीत समाधानकारक खुलासा न झाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला आपला विरोध नसल्याचे ॲड. नाईक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा किंवा आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका त्यांनी नोटीसमधून मांडली आहे.
एका व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बापट यांच्या वक्तव्यांवरून सुरू झालेला वाद आता कायदेशीर नोटीसपर्यंत पोहोचला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.