Vijay Shivtare
Vijay Shivtare  Sarkarnama
पुणे

'राऊत, कदम, मिर्लेकरांनी राष्ट्रवादीबरोबर कटकारस्थान करत माझा पराभव घडविला'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : खासदार संजय राऊत (Sanjay Raut), रवींद्र मिर्लेकर आणि बाळा कदम यांनी हवेलीत पैसे घेऊन घोटाळा केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) संगनमत करून माझा उमेदवार ‘राष्ट्रवादी’कडे नेला आणि एका फालतू माणसाला तिकिट दिलं. मी माझ्या त्या माणसाला तिकिट देऊ शकलो नाही. ज्या हवेलीत मी तब्बल १८००० मतांनी ‘प्लस’मध्ये असतो, त्या ठिकाणी या धोक्यामुळे, संजय राऊत यांच्या नालायकपणामुळे (त्यात शिवसेनेचे (Shivsena) सर्वच नेते सहभागी होते.) पराभूत झालो, असा गौप्यस्फोट माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केला. (Vijay Shivtare said the reason for the defeat in the assembly elections)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (ता. २ ऑगस्ट) पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत शिवतारे यांनी पुन्हा एकदा पराभवाची सल बोलून दाखवली. या वेळी माजी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विजय शिवतारे म्हणाले की, माझं पवारांशी वैयक्तीकरित्या काहीही वाकडं नव्हतं. विकास कामावरूनच मी त्यांच्याशी भांडत होतो. शिवसेना पक्षाने आदेश दिला म्हणून मावळ मतदारसंघातून आपले खासदार निवडून आले पाहिजेत, म्हणून मी मनापासून काम केलं. त्याचा राग धरून अजित पवारांनी भरसभेत सांगितले की, ‘तू आता कसा निवडून येतो, तेच बघतो?’ इतर काही गोष्टींवरून मी पराभूत झालो असतो, तर मला काहीच वाटलं नसतं. पण, मी आज जाहीररित्या सांगतो की, शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी संगनमत, कटकारस्थान करत माझा पराभव घडवून आणला. जनतेमधून मोठ्या मताने निवडून आलेला कोणताही आमदार दिसला की त्याचे पाय कापायचे, हे सर्व काम शिवसेनेतून होत होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा अशीच परिस्थिती होती.

पुरंदर उपसा सिंचन योजना शिवसेना-भाजप युतीच्या काळात म्हणजे १९९७ मध्ये मंजूर झाली. मी २००९ मध्ये आमदार असताना ती योजना पूर्ण करून घेतली. तुम्ही ५० वर्षांत आम्हाला काहीही दिलं नाही. पण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पंतप्रधानांपर्यंत जाऊन विमानतळाचा प्रकल्प आम्ही मंजूर करून आणला. किमान आमच्या पुढच्या पिढीच्या तोंडचा घास तरी हिरावून नेऊ नका, असे आवाहनही माजी मंत्री शिवतारे यांनी बोलताना केले.

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा राष्ट्रीय बाजार हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेत हलवला आहे. पुरंदरमध्ये सरकारची दोनशे एकर जागा त्यासाठी मोफत मिळत होती. मात्र, तो दुसरीकडे पळवला. याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. तुम्ही मुख्यमंत्री होता ना. आता तुम्हाला वाईट वाटतं, आता तुम्ही दुसऱ्याला गद्दार म्हणता. पण गेल्या तीन वर्षांत आम्ही किती अन्याय सहन केला आहे, असा सवालच शिवतारे यांनी भाषणातून ठाकरे यांना वारंवार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT