Pune : अजित पवारांच्या बंडाळीनंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अखेर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी द्यायची यावरून गेला आठवडाभर काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींमध्ये जोरदार राजकीय खलबते सुरू होती.
भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चाही केली होती. मात्र, वडेट्टीवारांच्या नावाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दर्शवला. यानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आलेल्या वडेट्टीवारांसमोर काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील 'नाराजीनाट्य' रंगल्याचं समोर आले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) रविवारी पुणे शहराचा दौरा केला. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजीचा सामना करावा लागला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्यात अंतर्गत धूसफूस पुन्हा उफाळून आली. यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवनिर्वाचित विरोधीपक्षनेत्यांसमोर पक्षातंर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान असणार आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पुणे काँग्रेस भवनात जाणार होते.मात्र, त्यांनी अचानक कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते वडेट्टीवार यांच्या गाडीतून खाली उतरले अन् थेट काँग्रेस भवनात दाखल झाले. त्यानंतर वडेट्टीवार धंगेकर यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या प्रसंगाने धंगेकर गट आणि शिंदे गटातील गटबाजी वडेट्टीवारांसमोरच चव्हाट्यावर आल्याची पाहायला मिळाली.
''...तर पुण्यात विधानसभेच्या आठपैकी सहा जागा जिंकू !
राज्य राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापनेचे जे उद्योग सुरू आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भाजप(bjp)विरुद्ध असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज असल्याचं वडेट्टीवारांनी यावेळी सांगितलं. तसेच, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे सोडून काँग्रेस पक्षाचे काम केल्यास पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान सहा-जागा आपण निश्चित जिंकू, असा विश्वास वडेट्टीवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
...हे अजितदादांना माहीत नव्हते का ?
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह(Amit Shah) हे गुजरातमधून येतात. मात्र, त्यांचे प्रेम महाराष्ट्रावर अधिक आहे. कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. कोणी माना किंवा न माना; पण प्रत्येक जावयाचे सासूरवाडीवर थोडे जादा प्रेम असते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहांचे कौतुक केले होते. यावरून विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे
अजितदादा यांना पाच वर्षांपूर्वी अमित शाह महाराष्ट्राचे जावई होते, हे माहीत नव्हते का? आता अजित पवार यांना हा जावाई शोध कसा लागला. अजित पवार सत्तेला सर्वोच्च मानतात. परंतु सत्तेला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना जनता बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही वडेट्टीवारांनी यावेळी केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.