OBC Reservation | Vijay Wadettiwar Meeting Sarkarnama
पुणे

OBC Reservation : भुजबळांनी जरांगेंबाबत मवाळ भूमिका घेताच वडेट्टीवारांनी डाव टाकला; ओबीसी नेत्यांची स्वतंत्र मोट बांधणार, दिवसही ठरला...

Vijay Wadettiwar OBC Reservation Meeting : छगन भुजबळ यांच्या या भूमिकेनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 24 Aug : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरूनही राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत उद्या (25 ऑगस्ट) राज्यातील ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सावध भूमिका घेतली आहे. "मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही. त्यावर आम्ही काय बोलणार? सरकार त्यावर बोलेल आणि योग्य तो निर्णय घेईल," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

भुजबळ यांच्या या भूमिकेनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

वडेट्टीवारांच्या बैठकीला ओबीसी नेत्यांना निमंत्रण

विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध ओबीसी नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, नवनाथ वाघमारे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले वातावरण आणि आगामी आंदोलनाची दिशा यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भुजबळ बैठकीला उपस्थित राहणार का?

छगन भुजबळ यांनी नुकतीच समता परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांसह ओबीसी आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही चर्चा झाली. मात्र, 1 सप्टेंबरच्या ओबीसी आंदोलनात भुजबळ सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

1 सप्टेंबरच्या आंदोलनाआधी शक्तिप्रदर्शन?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी ओबीसी समाजाकडूनही आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे 25 ऑगस्टची वडेट्टीवारांची बैठक आणि त्यानंतर 1 सप्टेंबरचे ओबीसी आंदोलन या दोन्ही घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेकडे बोट दाखवल्यानंतर वडेट्टीवारांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावल्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नेतृत्वाची नवी समीकरणे तयार होणार का? याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT