Vikram Kumar  Sarkarnama
पुणे

VikramKumar : महापालिका आयुक्त विक्रमकुमारांनी घेतला धसका; काय आहे कारण ?

Chaitanya Machale

Pune News : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याकडे विशेष लक्ष असते. त्यातच राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करीत अजित पवार हेदेखील सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

पालकमंत्री अजित पवार प्रत्येक आठवड्यात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात चालत असलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. पुणे महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा घेत त्यासाठी किती निधी उपलब्ध आहे. त्यामधून काम होणार आहे का? निधी उपलब्ध नसेल तर तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार देत असतात.

त्यातच आता पुढील काही महिन्यांत लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याची आचारसंहितादेखील लगेच सुरू होते. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात कामे करण्यास, तसेच एखाद्या कामासाठी उपलब्ध करून घेण्यास अडचणी निर्माण होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विक्रमकुमार आतापासूनच सतर्क झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महापालिकेचे 2024-25 चे बजेट तयार केले जाणार आहे. त्याचा आढावा पालिका आयुक्त यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या बजेटच्या कामातील टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या वर्क ऑर्डर 25 फेब्रुवारीपूर्वी काढा, असे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

बजेटमध्ये विकासकामांसाठी जो निधी उपलब्ध आहे. ती कामे पूर्ण होण्यासाठी वर्क ऑर्डर देणे गरजेचे असते. नवीन बजेट सुरू झाल्यानंतर जुन्या बजेटमधील निधीतून ही कामे करण्यास अडचण येते. त्यामुळे टेंडर प्रक्रिया दाबून वर्क ऑर्डर ठरवून दिलेल्या मुदतीत द्या, अशा सूचना विक्रमकुमार यांनी दिल्या आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात पालिकेच्या माध्यमातून शहरातील पावसाळी गटारे, नाले साफ करण्याची कामे केली जातात. प्रत्येक वर्षी टेंडर काढण्यास उशीर झाल्याने ही कामे जून महिन्यातदेखील सुरू असतात. यंदा पावसाळ्यापूर्वीचा काळ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कामाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी नियोजन तपासूनच केले जात आहे.

शहरातील नालेसफाई, पावसाळी गटारे साफ करण्यासाठीचे टेंडर प्रक्रिया सुरू करावी, असे आयुक्तांनी सांगितले आहे. नवीन वर्षाचे बजेट आचारसंहितेपूर्वी मान्य करून घेऊन त्यानंतर या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Edited by : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT