Pune Politics  Sarkarnama
पुणे

Pune Politics : मावळात विक्रांत, शिरूरला राजेश पांडे, तर बारामतीत जालिंदर कामठे भाजपच्या `महाविजय` चे समन्वयक

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी `इंडिया ` या आघाडीखाली विरोधी पक्ष एकटवटल्याने भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून आता ती प्रतिष्ठेचीही केली आहे. म्हणून ती जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून त्याकरिता `महाविजय २०२४` ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यातील ४८ लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक गुरूवारी नेमण्यात आले.

२०२४ ची लोकसभा निवडणूक ही `करो या मरो` ची लढाई असल्याचे भाजपच्या प्रदेश पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने आज `सरकारनामा`ला सांगितले. त्यातून ही निवडणूक पक्षाने किती गांभिर्याने घेतली आहे, याची कल्पना येते. महाराष्ट्र भाजपला ४५ जागांचे लक्ष्य मोदी-शहा-नड्डांनी दिले आहे. तर, देशपातळीवर सव्वातीनशे जागा जिंकून स्वबळावर बहूमताने केंद्रात सत्तेची हॅटट्रिक नोंदविण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यात त्यांनी आपले खासदार नसलेल्या जागा रडारवर घेतल्या आहेत. त्याच्या तयारीसाठी याअगोदर प्रत्येक मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुख नेमण्यात आले होते. त्यानंतर आता तेथे काल समन्वयकांचीही नेमणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय ठेवण्याचे काम करणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून अनुक्रमे विक्रांत पाटील,राजेश पांडे आणि जालिंदर कामठे यांची,तर पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांची नेमणूक भाजपने केली आहे. जेथे आमचा उमेदवार असेल तेथे या निुयुक्तीचा फायदा होईलच. पण,आमच्या या संघटनबांधणीचा मित्रपक्षाच्या उमेदवारालाही तो होईल,अशी प्रतिक्रिया मावळचे समन्वयक पाटील यांनी या नेमणुकीनंतर आज `सरकारनामा`ला दिली. बारामतीत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कामठे यांची नियुक्ती करीत भाजपने खेळी केली आहे. तर, प्रदेश उपाध्यक्ष पांडेवर शिरूरची जबाबदारी टाकत त्यांना पुणे शहरातून जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात उतरवले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT