Vilas Lande, Mahesh Landage .jpg Sarkarnama
पुणे

विलास लांडेंचा आमदार लांडगेंना इशारा : अन्यथा तुम्हाला पाणी पाजतील

सत्ताधारी भाजपने (BJP) आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचे गाजर दाखविले.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भोसरीचे भाजप (BJP) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) राजकारणातातील ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ आहेत, अशी स्तुती भाजप नेत्या व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लांडगे यांच्यी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नुकतीच (ता.30 नोव्हेंबर) भोसरीत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (ता.1 डिसेंबर) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून गरमागरम चर्चा झाली. तोच संदर्भ पकडून माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे-पाटील (Vilas Lande) यांनी लांडगेंवर गुरुवारी (ता.2 डिसेंबर) जोरदार टीका केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून शहरात सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा 1 नोव्हेंबरपासून नियमित केला जाईल, असे आश्वासन भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याची दिलेली कमिटमेंट फेल गेली, असा टोला लांडेंनी लगावला. दररोज पाणीपुरवठा करा. अन्यथा, शहरवासीय आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाणीपुरवठ्याबाबत सत्ताधाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आहे. ते केवळ दिखावा करण्यात आणि बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सुचना करण्यात व्यस्त आहेत. आंद्रा व भामा-आसखेड धऱणातून पाणी आणण्याचे गाजर दाखविले. अद्याप हा प्रकल्प मार्गी लावला नाही. तो मार्गी लावण्याची धमकच त्यांच्यात नाही. पाण्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे, असा हल्लाबोल लांडे यांनी केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली, जाधववाडी या पट्ट्यात मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. पण, तेथील लाखो लोकांना गेल्या चार वर्षांपासून पाणी विकत घ्यावे लागत आहे. मग पवना धरणातून संपूर्ण शहरासाठी उचलले जाणारे 490 एमएलडी पाणी फक्त अर्ध्या शहराला सोडले जाते का? अर्धे शहर टँकर माफियांद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोसले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या शहराच्या सत्ताकाळातील पाणीपुरवठा नियोजनाचा आदर्श आताच्या सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवा, असा टोमणा आ. लांडेंनी भाजपला लगावला. राष्ट्रवादीने 15 वर्ष महापालिकेत सत्ता सांभाळली. त्यावेळी शहरवासीयांना नित्यनियमाने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, भाजप सत्तेत येऊन तीन वर्षे झाली नाही, तोच त्यांनी दिवसाआड पाणीपुरवठा केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वास्तविक धरणातील पाणीसाठा पुरेसा असताना एक दिवसाआड पाणी का दिले जात आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. मुबलक पाणी नेमके कुठे वळविले आहे? पाणी नेमके कुठे मुरत आहे याचा शोध घ्या, अशी मागणीही त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली. पाणी पुरवठ्याचे रखडलेले प्रकल्प त्वरित मार्गी लावा. नाहीतर, येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नागरिकच पाणी पाजतील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT