पुणे

वळसे पाटील विरुद्ध आढळराव असा थेट सामना यंदा नाहीच

भरत पचंगे

शिक्रापूर : विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव या दोघांचा प्रत्यक्ष सामना या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र हे दोन्ही कट्टर राजकीय स्पर्धक एकमेकांच्या विरोधात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आढळराव यावेळी वळसेंना विधानसभेत आव्हान देतील, अशी अटकळ मंडली जात होती. मात्र शिवसेनेचा या मतदारसंघासाठीचा शोध अद्याप संपलेला नाहीय

वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव या दोन्ही पाटलांचा सन २००४ मध्ये लोकसभा निवडणूकीपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष राज्यात गाजला. त्यापुढील तीनही टर्म शिवाजीराव आढळराव यांनी हॅटट्रीक करीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकावला.

अर्थात प्रत्येक वेळी आढळराव यांना  पाडण्यासाठी वळसे लोकसभेच्या रिंगणात उभे न राहता सोपा उमेदवार त्यांच्याविरोधात देत असल्याची चर्चा घडत होती. यावेळी 2014 मध्ये राष्ट्रवादीने डॉ.अमोल कोल्हेंना उभे केले आणि आढळरावांच्या चौकाराचा फडशा पाडला.

याच पराभवाने आढळराव प्रचंड संतापलेले व अस्वस्थ असल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे वळसेंच्या विरोधात ते उभे राहतील, असा अंदाज होता.  आढळराव नसतील तर त्यांचे चिरंजीव अक्षय हे राजकारणाचा श्रीगणेशा या निवडणुकीत करतील. त्यासाठी ते वळसेंना आव्हान देण्याचा अंदाज होता. मात्र त्यांनीही ते टाळले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंगलदास बांदल हे शिवसेनेकडून उमेदवार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी अचानक राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून (अधिकृत पत्र नसताना) अर्ज दाखल केला. त्यामुळे शिवसेना येथे कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोर, वाहतूक सेनेचे दिपक घोलप, अपक्ष पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले यांचेकडे चाचपणी सुरू केली असून यातीलच एक उमेदवार वळसेंच्या विरोधात उभा केला जाईल, असे शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून खासगीत सांगितले जात आहे.

आंबेगाव-शिरुरमध्ये वळसेंना पाडणारा उमेदवार मी जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे उपनेते शिवाजीराव आढळराव आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना  कळविला असून आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून आज मी आंबेगाव-शिरुरच्या उमेदवाराच्याच हातून केक कापणार असून ही उमेदवारीही आजच रात्री उशिरापर्यंत श्री आढळराव जाहीर करणार असल्याचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT