Prithviraj Jachak-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे संचालक-जाचकांमधील वादावर अजित पवार कोणता तोडगा काढणार?

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावरच वाद पेटला आहे.

राजकुमार थोरात - Sarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व राष्ट्रवादीच्या संचालक मंडळातील मतभेद हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. कारखान्याच्या शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) झालेल्या बैठकीस जाचक यांना बसण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही संचालकांनी तीव्र विरोध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कारखान्याच्या कामकाजात सक्रीय झालेले जाचक आणि राष्ट्रवादीचे संचालक यांच्यात ‘छत्रपती’च्या निवडणुकीच्या तोंडावरच वाद पेटला आहे. आता अजित पवार हा वादावर काय निर्णय देणार?, याकडे इंदापूर, बारामती तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (What will Ajit Pawar decide on dispute between NCP director-Prithviraj Jachak?)

पृथ्वीराज जाचक आणि पवार कुटुंबीय यांच्यामध्ये २००३ मध्ये मतभेद झाल्याने जाचक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतली होती. जाचक यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधात २००४ ची लोकसभेची निवडणणूक लढवली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या प्रयत्नांमुळे जाचक व पवार कुटुंबीयांचे मनोमिलन झाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाचक यांनी झाले गेले विसरुन गेल्या दीड वर्षापासून छत्रपती कारखान्याच्या कारभारामध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या गळीत हंगामात जाचक हे दररोज नियमित कारखान्याच्या उत्पादन विभागामध्ये बसून राहिले. तसेच, संचालक मंडळाच्या बैठकीलाही हजेरी लावत होते. जाचकांची उपस्थिती काही संचालकांना सुरवातीपासूनच खटकत होती. गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये साखरेची गुणवत्ता व रिकव्हरी वाढली होती, त्याचे श्रेय कोणाचे हा प्रश्‍न वेगळा आहे. मात्र, त्यामुळे उस उत्पादक सभासदांचा फायदा झाला.

संचालक मंडळाच्या शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) झालेल्या बैठकीत जाचक यांना अचानकपणे बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्याला विरोध करत जाचक यांनी बाहेर जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे जाचक विरुद्ध संचालक मंडळ असा वाद वाढला. वरिष्ठांनी वेळीच लक्ष न घातल्यास हा वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

येत्या काही महिन्यांमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्याचे पडसाद निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाचक वगळता मोठे विरोधी नेतृत्व नाही, त्यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक तशी सोपी आहे. पण, राष्ट्रवादीच्या संचालकांनी जाचकांशीच उभा दावा मांडला आहे. कारखान्याचे संचालक उपमुख्यमंत्री पवार यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे जाचक व संचालक मंडळात सुरु झालेल्या वादामध्ये आता अजितदादा लक्ष घालणार? याकडे नीरा खोऱ्याचे लक्ष लागले आहे. हा वाद न मिटल्यास श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समिती विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT