Pune Congress  Sarkarnama
पुणे

Congress : कोण होणार पुणे काँग्रेसचे अध्यक्ष; शिंदेच कायम राहणार की किराड-बहिरट बाजी मारणार!

Pune Congress : नव्या रचनेत पुण्याच्या शहराध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार

सरकारनामा ब्यूरो

Congress : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन पुढील महिन्यात रायपूरला होणार आहे. या अधिवेशनाआधी ब्लॉक कॉंग्रेस, शहर व जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची रचना करण्यात येणार आहे. या नव्या रचनेत पुण्याच्या शहराध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक विरेंद्र किराड व दत्ता बहिरट यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी माजी आमदार आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडून शहराध्यक्षपद काढून अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी स्वरूपात देण्यात आले. बागवे यांची शहराध्यक्षपदाची पाच वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या जागी शिंदे यांची प्रभारी नेमणूक करण्यात आली. दरम्यान, सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. शहराध्यक्षांची निवड करून कॉंग्रेसदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

येत्या दोन वर्षात महापालिका, त्यानंतर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. ज्या अध्यक्षांची निवड होईल. त्यांच्याच अध्यक्षतेखाली पुढील तीन निवडणुका लढल्या जातील. त्यामुळे या काळात अध्यक्ष कोण होणार याला विशेष महत्व आहे.

शहरात कॉंग्रेसची सुरवातीपासून मोठी ताकद आहे. सध्याच्या राजकारणात भाजपाची ताकद वाढलेली दिसत असली तरी पुणे हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तळागाळात पोचलेला पक्ष अशी कॉंग्रेसची शहरातली स्थिती होती. कॉंग्रेसच्या विचारांशी बांधलेला आजही किमान तीन लाख मतदार आहे.

पाच वर्षापूर्वी रमेश बागवे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यावेळी किराड व बहिरट यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता रायपूरच्या अधिवेशनाआधी संघटनात्मक निवडणुका होणार असल्याने पक्षाला पुण्यात पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्याबरोबर स्पर्धेत असलेले बहिरट व किराड पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत. महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT