Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad Pawar Sarkarnama
पुणे

पवारांचा सल्ला सत्ताधारी-विरोधक ऐकणार का?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पासह वेगवेगळ्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. हा वाद थांबविण्याचा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिला आहे. जे झाले ते झाले. प्रकल्प आता परत येणार नाही. त्यामुळे वाद घालण्यापेक्षा विकासाच्या प्रश्‍नावर बोला, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, ‘‘ आरोप-प्रत्यारोप करून वाद घालण्यापेक्षा राज्याचे हिताचे यापुढे काय करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे. दोन्ही बाजूंनी यावर विचार झाला पाहिजे. एकमेकांना दुषणे देण्याऐवजी राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा व्हायला हवी.’’

फॉक्सकॉनचा प्रकल्प याआधी कोकणातही आला होता. मात्र, त्या कपंनीकडून नंतर प्रकल्प स्थगित करण्यात आला. त्यामुळे घोषणा झाली तरी प्रत्यक्षात प्रकल्प येईल, असा या कंपनीचा लौकिक नाही, असे पवार यांनी सांगितले. केंद्रात सत्ता असल्याने काही विशिष्ट राज्यांनाच लाभ होतोय, हे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक दौरे गुजरातला झाल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक विकासाच्या पातळीवर महाराष्ट्र कायमच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे सांगणे म्हणजे लहान मुलाला मोठा फुगा आणून देतो, असे म्हणण्यासारखे असल्याची टीका पवार यांनी केली. सत्तेच्या जोरावर केवळ उद्योग नव्हे तर राजकीय सत्ता संपादन करण्याचा नवा प्रकार देशात सुरू आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आणि आता महाराष्ट्रात त्याचा अनुभव जनता घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT