BJP News : भारतीय जनता पार्टीच्यावतीने पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण, याची चर्चा जोरात असताना प्रदेश भाजपाने एक नवीच घोषणा केली आहे. पक्षाच्या प्रदेश शाखेने ४२ प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून त्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यात आणखी भर घालून नव्या नावांसह यादी आज पुन्हा प्रसिद्ध केली आहे.
नव्या यादीत कुणाल टिळक (Kunal Tilak) यांचा समावेश करण्यात आल्याने त्याचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ लागले आहेत. ज्याअर्थी कुणाल यांना प्रवक्ते केले त्याअर्थी त्यांचे वडील शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना कसब्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात बीडकर, रासने किंवा घाटे यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचे असल्याचे हे निरीक्षक सांगत आहेत. त्यातही बीडकर यांचे पारडे जड असल्याचे आजच्या घडामोडींनंतर निरीक्षक सांगत आहेत.
उमेदवारीसाठी टिळक इच्छुक आहेतच शिवाय बीडकर, रासने व घाटे हेदेखील तितकेच मोठे दावेदार आहेत. या साऱ्यांनीच पक्षासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. मात्र, चिंचवड मतदारसंघात दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिल्यास पुण्यात वेगळा न्याय देता येईल का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. मात्र, कुणाल यांच्या प्रदेश प्रवक्तेपदाच्या नियुक्तीने शैलेश टिळक यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत संपत आल्याने येत्या दोन दिवसात भाजपाचे कसबा व चिंचवडचे उमेदवार पक्षाला जाहीर करावे लागतील. त्यामुळे सर्व इच्छुक आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटी-गाठीसाठी रासने, बीडकर व घाटे यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत असली तरी भाजपासाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. काँग्रेस ही निवडणूक गांभीर्याने लढणार असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे काँग्रेसचे (Congress) उमेदवार झाले तर भाजपासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असेल हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.