Devendra Fadnavis, Maroti Bhapkar, PCMC Latest News
Devendra Fadnavis, Maroti Bhapkar, PCMC Latest News Sarkarnama
पुणे

मुंबईप्रमाणे PCMC मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी करणार का?

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी `कॅग`मार्फत करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता.३० ऑक्टोबर) जाहीर केले. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची अशी चौकशी करण्याची लेखी मागणी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आज (ता.३१ ऑक्टोबर) फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

गेल्या पाच वर्षात पिंपरी महापालिकेत भाजप सत्तेत होती. त्यामुळे भापकरांची मागणी भाजप सत्तेत असलेले राज्य सरकार अजिबात मान्य करण्याची शक्यता नाही. मात्र, त्यांच्या मागणीमुळे पिंपरी पालिकेतील कथित कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे. त्याबाबत शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार असताना नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. (Devendra Fadnavis, Maroti Bhapkar, PCMC Latest News)

दरम्यान, मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल फडणवीसांचे अभिनंदन करीत या निर्णयाचे भापकरांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचाराचीही अशीच त्वरेने निर्णय घेत चौकशीची मागणी त्यांनी रेटली आहे. पिंपरी पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत, घरोघरचा कचरा गोळा करून तो कचरा डेपोपर्यंत पोचविण्यात, निगडीतील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर कामात, रस्त्यांच्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या कामात, चिखली येथील संतपीठाच्या निविदेत एवढेच नाही, तर मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या संतती नियमनातही गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भापकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

अनाधिकृत जाहिरात फलक काढणे, खाजगी केबल नेटवर्किंगच्या (रिलायन्स) रस्ते खोदाई, रस्ते साफसफाई, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, पिंपरी, रुग्णालय उभारणी व तेथील यंत्रसामुग्री खरेदी, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी भरती, शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदी, पवना, इंद्रायणी, मुळा नदीतील जलपर्णी काढण्याचे तसेच खड्डे बुजवण्याचे काम, स्मार्ट सिटीतील काम, २४ बाय ७ पाणी योजना, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, सिमेंट कॉंक्रिटीकरण, बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी, कै. मोरे प्रेक्षागृह नूतनीकरण, प्राधिकरणातील कै. माडगूळकर प्रेक्षागृह उभारणी, कोरोना काळातील स्पर्श घोटाळा, अशा एकूण ४२ कामांत घोटाळा झाल्याचे भापकरांचे म्हणणे आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT