Talwade Incident  Sarkarnama
पुणे

Winter Session Nagpur : लांडगे, खापरेंनी विधिमंडळात मांडला तळवडे दुर्घटनेचा मुद्दा; 'बर्निंग वॉर्ड'चा मुद्दा ऐरणीवर

Uttam Kute

Pimpri News : नऊ जणांचा बळी घेणाऱ्या तळवडे कारखाना दुर्घटनेचा मुद्दा विधिमंडळात पोहचणार, अशी बातमी रविवारी (ता. 10 डिसेंबर) `सरकारनामा`ने दिली अन हा प्रश्न आज (ता. 11 डिसेंबर) विधीमंडळात उपस्थित झाला. त्यामुळे त्यात बळी गेलेल्या नऊ महिलांच्या कुटुंबांना आणि जखमी महिलांना सरकारी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच, या विषयावर स्वतंत्रपणे पाऊण तास चर्चाही विधान परिषदेत होणार आहे. (Mahesh Landge, Uma Khapare raised the issue of Talwade incident in legislature)

चिंचवडमध्ये तळवडे येथील शिवराज एंटरप्रायजेस या स्पार्कल मेणबत्ती बनविण्याच्या बेकायदेशीर कारखान्यात शुक्रवारी (ता. 8 डिसेंबर) दुपारी स्फोट होऊन लागलेल्या आगीत नऊ महिला होरपळून आणि गुदमरून मृत्युमुखी पडल्या, तर सात महिला गंभीर भाजल्या. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परवा ससूनमध्ये जाऊन जखमी महिलांची चौकशी केली. रविवारी त्यांनी विधान परिषद सदस्या उमा खापरे यांच्यासह घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर हा विषय विधीमंडळात उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. औचित्याच्या मुद्याद्वारे खापरे यांनी तो मांडला. त्याला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

विधानसभेत आमदार लांडगेंकडून प्रश्न उपस्थित

नऊ महिला कामगारांचे बळी घेणारा शिवराज..हा उद्योग रेडझोनमध्ये म्हणजे अनधिकृत होता. तसेच, उद्योगनगरीत बर्न वॉर्ड नसल्याने तेथील गंभीर भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करावे लागते, याकडे ‘सरकारनामा’ने 8 तारखेलाच लक्ष वेधले होते. हे दोन्ही मुद्दे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मांडण्यात आले.

विधान परिषदेत उमा खापरेंनी हा कारखाना बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तर, विधानसभेत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बर्न वॉर्ड तथा हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली. गेल्या वर्षभरात आगीत जखमी झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील 130 हून अधिक रुग्णांना पुण्यात उपचारासाठी जावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी विरोधी पक्षनेत्यांकडूनही बर्निंग वॉर्डची मागणी

दरम्यान, तळवडे येथील आगीत भाजलेल्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत शहरात बर्निग वॉर्ड असता, तर त्यातील काहीजण नक्की वाचले असते, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनीही शहरात पालिका रुग्णालयात बर्निंग वॉर्ड उभारण्याची मागणी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आज केली. शहरात असा वॉर्ड नसणे ही खेदाची बाब आहे, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT