Municipal Election sarkarnama
पुणे

तीन पक्षांच्या सरकारकडून तीनचा प्रभाग अन् नगरसेवकांची वाढली डोकेदुखी

महापालिकेत पुन्हा सत्तेत येऊ पाहणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसही या पद्धतीवर काहीशी नाराज दिसली.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पाच महिन्यावर आलेल्या महापालिका निवडणुकीत (Municipal Election) प्रभाग कितीचा होणार याचा अंदाज आल्याने बहूतांश नगरसेवक (Corporator) आता एकदम अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आता त्यांनी कुठलीही समस्या फक्त व्हाटसअप करा, सोडविली जाईल, असे सांगण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, आरक्षण सोडत बाकी असल्याने आरक्षण पडणार याचा, मात्र अंदाज न आल्याने तूर्तास अनेक नगरसेवकांनी आपले कुटुंबही सक्रिय केले आहे. (With the election approaching, the corporators became active)

दरम्यान, तीनच्या प्रभागाने नगरसेवकांचीच नाही, तर प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. गतवेळच्या चारच्या प्रभागाची तीनसाठी पुन्हा तोडमोड करावी लागणार आहे. परिणामी आपल्या हक्काची व्होटबॅंक असलेला भाग लगतच्या प्रभागात जाण्याच्या भीतीने काही नगरसेवकांची झोप उडाली आहे. तशी चिंता धास्तावलेल्या काही नगरसेवकांनी बोलून दाखवली. पन्नास टक्के महिला आरक्षण प्रभागात टाकताना प्रशासनाला आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पूर्वीच्या चारच्या प्रभागात दोन महिला, दोन पुरुष असे सहजपणे आरक्षण टाकणे सोईचे जाणार होते. तसेच दोनचा प्रभाग झाला असता, तरी एकेक पुरुष व महिला असे सोपे आरक्षण देता येणार होते. मात्र, तीन पक्षांचे सरकार असलेल्या सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्वीकारून त्रांगडे निर्माण केले. असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नव्या प्रभाग रचनेचा काहीसा फटका बसणार असल्याची भीती असलेल्या सत्ताधारी भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकाने दिली.

महापालिकेत पुन्हा सत्तेत येऊ पाहणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसही या पद्धतीवर काहीशी नाराज दिसली. दोनचा सोईस्कर प्रभाग फायदेशीर असल्याने तो त्यांना हवा होता. मात्र, अद्याप आम्ही आशा सोडलेली नाही, असे राष्ट्रवादीच्या एका जबाबदार शहर पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, तीनचा प्रभाग होणार हे कळल्याने गेले साडेचार वर्षे सभागृहात व बाहेरही गप्प असलेले अनेक नगरसेवक आता भलतेच सक्रिय झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रभागातीलच विविध समस्यांप्रश्नी त्यांनी प्रशासनाकडे निवेदने देण्याचा सपाटा लावला आहे.

शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील व त्यातही पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक त्यात आघाडीवर आहेत. तर, काही नगरसेवक सोशल मिडीयातून अधिक सक्रिय झाले आहेत. प्रभागातील समस्यांची त्यांना कधी नव्हे ती आता प्रकर्षाने जाणीव झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी व्हाटसअपवर संपर्क साधा, त्या सोडविल्या जातील, असे आवाहन त्यांनी केले आहे. अॅक्टिव्ह मोडवर आलेल्या या नगरसेवकांच्या जोडीने शहरातील भोसरी, चिंचवड व पिंपरी येथील तिन्ही आमदारही शहरातील पालिका निवडणूक पाच महिन्यांवर आल्याने ते सुद्धा अधिक सक्रिय झाले आहेत. आता फक्त त्यांना प्रभाग आरक्षण कसे पडते त्याची त्यांना उत्सुकता आहे. प्रभागरचना, पद्धत व आरक्षणही यावेळी बदलणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकाच्या जोडीने त्याचे कुटुंबही सक्रिय झाले आहे. परिणामी नगरसेविका असलेल्या प्रभागात तिचा पती व मुलगा, तर नगरसेवक असलेल्या ठिकाणी पत्नीचा पर्याय अनेकांनी आतापासून ठेवण्यास सुरवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT