Officials and staff at YCM Hospital faced action after drums, tasha and a band were played on the hospital premises during the Ganesh immersion procession. AI Image
पुणे

Pune Ganeshotsav : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल वाजवणं अंगलट; दोन महिला डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

YCM Hospital Dhol Tasha Case : पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा आणि बँड वाजवल्याप्रकरणी १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याचवेळी पोलिसांनीही कारवाई करत दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Jagdish Patil

YCM Hospital Dhol Tasha Case : गणेशोत्सवातील ढोल-ताशा वादन आणि डीजेच्या आवाजाचा मुद्दा यंदा पुणे शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात वाद्य वाजवण्यावर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आक्षेप घेतला होता. उत्सवाचा जल्लोष आणि नागरिकांचे आरोग्य, रुग्णालय परिसरातील शांतता यांच्यात समतोल राखण्याचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला होता. त्यावरून चर्चा आणि वादही रंगला.

याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCM) आवारात ढोल-ताशा वाजवणे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंगलट आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा आणि बँड वाजवल्याप्रकरणी १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याचवेळी पोलिसांनीही कारवाई करत दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयाच्या आवारातच ढोलवादन

वायसीएम रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त कर्मचारी महासंघासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली होती. गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान रुग्णालयाच्या आवारातच ढोल-ताशा आणि बँड वाजवण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकारी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वादन सुरू असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.

नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्तांची दखल

व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी याबाबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रारी केल्या. रुग्णालयाच्या परिसरात ढोल-ताशा किंवा इतर वाद्ये वाजवणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या तक्रारींची दखल घेत आयुक्त सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

१३ जणांना कारणे दाखवा नोटीस

आयुक्तांच्या आदेशानंतर डॉ. वाबळे आणि डॉ. दादेवार यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनाशी संबंधित १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे संबंधितांकडून तत्काळ खुलासा मागवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. दादेवार यांनी दिली.

दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांवर गुन्हा

दरम्यान, ढोल-ताशा वादनाच्या या प्रकरणात पोलिसांनीही स्वतंत्रपणे कारवाई केली आहे. वायसीएम रुग्णालय परिसर शांतता क्षेत्रात येतो. कोणतीही परवानगी न घेता रुग्णांना वाद्यांच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याची जाणीव असतानाही ढोल, ताशा आणि बँड वाजवल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आशिष गायकवाड यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार दोन महिला डॉक्टर, बँडच्या मालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT