YCM Hospital Latest News Sarkarnama
पुणे

चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याने पिंपरीतील YCM रुग्णालयाची तोडफोड

YCM Hospital : पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मात्र, तो मृतदेह दुस-याच व्यक्तीचा होता.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदल झाली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांची कुमक येथे वाढविली आली आहे. (YCM Hospital Latest News)

वायसीएम रुग्णालयातील शवगृहातून (डेडहाऊसमधून) नेण्यात आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाली. नातेवाईक एकाचा मृतदेह घाईगडबडीत घेऊन गेले. त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केले. मात्र, तो मृतदेह दुस-याच व्यक्तीचा होता. यामुळे हा पुढील गोंधळ झाला आहे.

अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रुग्णालयात आल्यावर त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह दुस-यांनी नेल्याचे त्यांना समजले. यामुळे आपल्या व्यक्तीच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे त्यांना लक्षात आले. हे समजताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. वाबळेंच्या दालनाची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आज (ता. १९ ऑक्टोबर) दुपारी हा प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (ता. १८ ऑक्टोबर) दापोडी येथे भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचे वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, थेरगाव परिसरातील एका मृत महिलेचे देखील शवविच्छेदन येथेच करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी थेरगाव येथील मृत महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनगृहातून मृतदेह नेला. मात्र, तो मृतदेह दापोडी येथील मृत महिलेचा होता. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

दरम्यान, दापोडी येथील मृत महिलेचे नातेवाईक मृतदेह घेऊन जाण्यासाठी शवविच्छेदनगृहात आले. त्यावेळी त्यांना थेरगाव येथील मृत महिलेचा मृतदेह देण्यात आला. मात्र संबंधित मयत व्यक्ती आपले नातेवाईक नसल्याचे दापोडीमधील नातेवाईकांच्या लक्षात आल्याने मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दापोडीच्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने रुग्णालयात गोंधळ होऊन तोडफोड झाली. दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT