YCMOU Online Approval Sarkarnama
पुणे

UGC Approval News : कॉलेजला जाण्याची गरज नाही! घरबसल्या बि. कॉम, एमसीए करा; यूजीसीची मोठी घोषणा

YCMOU Online Approval : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी.कॉम आणि एमसीए अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू करण्यास यूजीसीची मान्यता मिळाली आहे. विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊन ऑनलाइन परीक्षाही देऊ शकणार आहेत.

Sudesh Mitkar

YCMOU Online Approval News : नियमित महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी कॉम आणि एमसीए हे अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेवर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेता येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून यापूर्वीच विविध प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने सुरू आहेत. आता ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून बी कॉम आणि एमसीएचे शिक्षण घरबसल्या घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी विद्यापीठाला बीसीए आणि एमबीए हे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली होती. यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या विस्ताराला आणखी वेग मिळणार आहे.

नोकरी सांभाळत शिक्षण

ऑनलाइन अभ्यासक्रमाचा सर्वाधिक फायदा नोकरी करणारे, व्यवसाय करणारे तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे. नियमित महाविद्यालयात उपस्थित राहणे शक्य नसतानाही विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार अभ्यास करता येणार आहे.

विद्यापीठाने या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली आहे. अभ्यासक्रमातील क्रेडिटनुसार व्हिडीओ व्याख्याने तयार करण्यात आली आहेत. एका क्रेडिटसाठी सुमारे १५० व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक व्हिडीओ साधारण सात ते दहा मिनिटांचा असेल.

विशेष म्हणजे केवळ व्हिडीओ पाहून पुढे जाता येणार नाही. एक व्हिडीओ पूर्ण केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील व्हिडीओ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि अभ्यासाची सातत्यता कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

१०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर

ऑनलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची कमतरता भासू नये यासाठी विद्यापीठाने मेंटॉरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर नियुक्त केला जाणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुप आणि ई-मेलच्या माध्यमातून हे मेंटॉर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

परीक्षाही होणार ऑनलाइन

या अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. प्रॉक्टर-बेस्ड परीक्षा प्रणालीचा वापर करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परीक्षेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षणापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. घर, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी बी कॉम आणि एमसीएचे ऑनलाइन शिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT