Pune News : जिल्हा परिषद सभागृहात घडलेल्या धक्कादायक आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सभागृहात प्रवेश करणाऱ्या सदस्यांसह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्र व प्रवेश नियमावली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनाही सभागृहात प्रवेश करताना आपली ओळख स्पष्ट करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान २७ जुलै रोजी एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी वेळीच तिच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संबंधित महिलेने जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली.
या प्रकारानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सभागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आता सभागृहात प्रवेशासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन सदस्यांची ओळख सहज पटावी, तसेच अनोळखी व्यक्तींना सभागृहात प्रवेश मिळू नये, यासाठी सदस्यांना विशेष 'बॅज' किंवा ओळखपत्र देण्यात येणार आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र बॅज देण्यात येत होता. मात्र, यावेळी अनेक सदस्य प्रथमच निवडून आल्याने त्यांची ओळख प्रशासनाला तत्काळ पटत नसल्याची अडचण निर्माण झाली. त्यामुळे आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांसाठीही विशेष ओळखपत्राची व्यवस्था केली जाणार आहे.
सभेच्या वेळी सभागृहाबाहेर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, जिल्हा परिषदेची अंतर्गत सुरक्षा यंत्रणाही कार्यरत राहणार आहे. प्रवेशव्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियमावली तयार केली आहे.
दरम्यान, सभागृहात घडलेल्या या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता नवीन नियमावली आणि ओळखपत्राच्या माध्यमातून सभागृहात प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभांमध्ये सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नव्या सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.