sahakar.jpg 
राज्य

शिखर बॅंकेच्या "त्या' विषयाच्या चौकशीला गती 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने दोन दिवस नगर जिल्ह्यात मुक्काम ठोकत गोपनीय तपास केला.

डाॅ. बाळ ज. बोठे पाटील

नगर : राज्याची शिखर बॅंक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कथित नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणाच्या चौकशीला पोलिसांकडून गती मिळाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने दोन दिवस नगर जिल्ह्यात मुक्काम ठोकत गोपनीय तपास केला. स्थानिक पोलिस, तसेच जिल्ह्यातील राजकीय व सहकारातील यंत्रणांना मात्र या पथकाचा मागमूसही लागला नाही, हे विशेष. नगर जिल्ह्यातील तपास करून हे पथक बीडला रवाना झाले. 

के वळ जिल्हा बॅंकांचीच नव्हे, तर राज्याच्या सहकार खात्याची राज्य सहकारी बॅंक ही शिखर बॅंक मानली जाते. प्रत्येक जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा शिखर बॅंकेच्या संचालक मंडळात समावेश आहे. साहजिकच, सहकार क्षेत्रात या बॅंकेला विशेष महत्त्व आहे. बॅंकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी राज्यातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व इतर संस्थांना कोट्यवधींचे नियमबाह्य कर्ज दिल्याच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या राजकीय व सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. 

ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख, माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे नगर जिल्ह्यातील तीन नेते "त्या' कालावधीत शिखर बॅंकेच्या संचालक मंडळावर होते. त्यांपैकी गडाख जिल्हा बॅंकेतर्फे, तर तनपुरे व घुले राज्य साखर संघातर्फे संचालक होते. कथित नियमबाह्य प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे राजकीय व सहकारातील मंडळींसह जिल्ह्याचे लक्ष होते; परंतु नंतरच्या काळात हे प्रकरण शांत झाल्याने त्याचा विसर पडला. 

राज्य सहकारी बॅंकेने साखर कारखाने व सहकारी संस्थांना त्यांच्या मालमत्तेचे मूल्यमापन करून त्या प्रमाणात कर्ज दिले. पुढे ते कर्ज थकीत झाल्याने कारखाने अथवा संबंधित संस्थांच्या बॅंकेच्या तारण असलेल्या मालमत्तांची विक्री करण्याची जाहिरात बॅंकेने दिली; परंतु "त्या' मालमत्ता अपेक्षित दराने खरेदी करण्यासाठी कोणीही धजावले नाही. परिणामी, बॅंकेला काही प्रकरणांत तब्बल दहा ते पंधरा वेळा जाहिरात द्यावी लागली. मात्र, अपेक्षित दराने मालमत्ता विकल्या गेल्या नाहीत. परिणामी, बॅंकेचा मोठा तोटा झाला. या संदर्भात न्यायालयीन मार्ग अवलंबिण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने चौकशी झाली. पोलिसांनी "नील' रिपोर्ट दिला; परंतु पुन्हा न्यायालयाची दारे ठोठावण्यात येऊन चौकशी सुरू झाली. आता पोलिसांनी पूर्वीच्या "नील' रिपोर्टच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात असलेली जिल्हाबंदी भेदून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील "माहीतगार' पोलिसांचा समावेश असलेले पथक नगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. जिल्हा पोलिस दल, राजकीय मंडळी अथवा जिल्हा बॅंकेसह सहकारातील अधिकारी व पदाधिकारी यांच्यापैकी कोणालाही या पथकाच्या आगमन व तपासकार्याची माहिती मिळू न देण्याची दखल घेण्यात आली. पथकाने नगर, राहुरी, सोनई येथे तपास केला. त्यासाठी सुरक्षित ठिकाणी हे काम करण्यात आले. या संदर्भात शिखर बॅंक व नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले. 

तपास अन्‌ कागदपत्रांची पडताळणीही! 

या तपासाचाच भाग म्हणून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे खास पथक गेले दोन दिवस जिल्ह्यात तळ ठोकून होते. या पथकाने संबंधितांकडे चौकशी केली. काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याचे सांगण्यात येते. या काळात पथकाने संबंधितांशी जास्त संपर्क ठेवणे अथवा त्यांचा पाहुणचार घेण्याचेही साफ नाकारले. दोन दिवसांच्या नगर जिल्ह्यातील गोपनीय तपासानंतर हे पथक बुधवारी (ता. 10) नगर व बीड जिल्ह्यांची सीमाबंदी भेदून बीडला रवाना झाले. बीडमध्येही पथक शिखर बॅंकेसंदर्भातच गोपनीय तपास करणार असल्याचे समजते. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT