राज्य

विजय शिवतारेंचे सरकारमध्ये काही चालत नाही: अजित पवार 

सरकारनामा ब्युराे

सातारा : दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी जिहे-कठापूर योजना आम्ही मंजूर केली. मात्र, गेल्या तीन वर्षात पुरेसा निधी या सरकारला उपलब्ध करता आला नाही. साताऱ्याच्या पालकमंत्र्यांकडे (विजय शिवतारे) जलसंपदा मंत्रीपद आहे, मात्र, सरकारमध्ये त्यांचे काही चालत नाही. राज्याला मागे नेण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटाव येथील कार्यक्रमात केली. 

विविध विकास कामांचे उद्‌घाटन, शेतकरी मेळावा आणि जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते यांचा वाढदिवस कार्यकम या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विधानसभेतील पक्ष प्रतोद व आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रदिप विधाते, यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, सरकारने कर्जमाफीची लाल पिवळी, हिरवी यादी तयार केली आहे. ही काय सिग्नल यंत्रणा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून कर्जमाफीच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मंत्र्यांच्या गाड्या लोक व शेतकरी का अडवायला लागलेत याचे सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणारी जिहे-कठापूर योजना आम्ही मंजूर केली. मात्र, या सरकारला गेल्या तीन वर्षात पुरेसा निधी उपलब्ध करता आलेला नाही. साताऱ्याचे पालकमंत्र्यांकडे जलसंपदा मंत्रीपद आहे. पण सरकारमध्ये त्यांचे काही चालत नाही. राज्याला मागे नेण्याचे काम सरकार करीत आहे. 

हे कोणा येड्यागबाळ्याचे काम नाही! 
जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. पवार यांनी विधातेंच्या कामांबद्दल गौरवोद्‌गार काढले. खटावची ग्रामपंचायत चार वेळा 17 विरूध्द शुन्य ने जिंकण्याचे रेकॉर्ड विधातेंनी 
केले आहे. हे कोणा येड्यागबाळ्याचे काम नाही, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT