ajit pawar
ajit pawar 
राज्य

अजितदादांपुढे पुणे जिल्हा परिषदेच्या संभाव्य कारभारऱ्यांच्या आज परिक्षा!

भरत पचंगे, शिक्रापूर

शिक्रापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि इतर समित्यांच्या पदाधिका-यांच्या निवडीबाबतची महत्वाची बैठक आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात दुपारी एक वाजल्या पासून सुरू होत आहे. 

जिल्ह्यातील सर्व इच्छुक जिल्हा परिषद सदस्यांना या बैठकीसाठी बोलावण्य़ात आले असून इछुक सदस्यांना ’याबाबतचा निर्णय अजित दादाच घेणार’ असल्याचे मोठ्या साहेबांनी भेटायला येणा-या प्रत्येक सदस्याला सांगितल्याने आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. 

अर्थात राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेची महाविकास आघाडी राज्यात झाल्याने जिल्ह्यातील शिवसेनेबाबत काय भूमिका घ्यायची याबाबतची मतेही आज आजमावली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
        
विधानसभा निवडणूकीमुळे आधीच तीन महिने लांबलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष व इतर समित्यांच्या पदाधिका-यांच्या निवडीसाठी ४२ सदस्य असलेला जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीभोवती या निवडीचे राजकारण केंद्रीत झाले आहे. 

आता राज्यातही पक्ष सत्तेत आल्याने राष्ट्रवादीच्या सर्वच सदस्यांना अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे वेध लागलेले आहेत. याच पार्श्वभूमिवर सर्व इच्छुकांनी आपापल्या आमदारांना मध्यस्थी घेवून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांपर्यंत भेटून आलेले आहेत. 

राज्याच्या राजकारणात अत्यंत व्यस्त असतानाही मोठ्या साहेबांनी साधलेला संवाद अनेक सदस्यांना सुखावून गेला असला तरी ’या बाबतीत अजितदादांनाच सर्व अधिकार आहेत तेच ठरवतील...’ असे मोठ्या साहेबांनी सांगितल्याने बहुतेक सर्व इछुकांचा मोर्चा अजितदादांकडे वळाला आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दादांनी पुण्यातील जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी एक वाजता बोलाविलेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

या बैठकीचे सर्व संयोजन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर करणार असून दादांनी प्रत्येक इच्छुकाशी स्वतंत्र बोलावे असे नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे येणार असल्याची कुणकुण होती. मात्र त्या बैठकीला येणार नसून पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता जिल्हा बॅंकेच्या एका महिला पदाधिका-यांनी सांगितली.

निवडी पुढील वर्षात सन २०२० मध्ये...?
अध्यक्ष-उपाध्यक्ष व विशेष समित्यांच्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रीया एक जानेवारीनंतरच होणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या एका बैठकीत स्पष्ट करण्यात आली. याबाबत स्वत: अजितदादांनी कुण्या माहितगार प्रशासकीय अधिका-याशी चर्चा करुन खात्री करुन घेतली असून आजच्या बैठकीत इच्छुकांचे मते अजमावून पुढील १५ दिवसांत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाबाबत जिल्ह्याचा मेळ घालून निर्णय घेतला जाणार असल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT