Approval of Rs 495 crore for Satara Medical College
Approval of Rs 495 crore for Satara Medical College 
राज्य

मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली; अजितदादा, अमित देशमुखांनी दिली ४९५ कोटींच्या निधीस मान्यता

सरकारनामा ब्यूरो

सातारा : साताऱ्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 495 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीस आज प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या निर्धारित जागेवर दोन टप्प्यांत प्रत्यक्ष बांधकाम होणार आहे.

पहिल्या टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय व 300 खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम होईल. ते पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 200 खाटांच्या रुग्णालयाचे काम होणार आहे. बारामतीच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्‍यक होते.

सध्या मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले आहे. नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली नव्हती. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उच्चस्तर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 495 कोटी 46 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे.

याबाबतचा शासन निर्णय आज उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे रुग्णालय इमारत आणि त्या अनुषंगिक बांधकाम केले जाईल. त्यामुळे पुढील वर्षी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रिया आणि 60 एकर जागेत बांधकामाची प्रक्रिया एकाच वेळी सुरू होईल. 

शिवेंद्रसिंहराजेंनी मानले आभार 

मेडिकल कॉलेजसाठी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले. जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे केली होती. त्याला यश मिळाले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT