औरंगाबाद : शहर आघाडीच्या गटनेतेपदी तुमच्या नावाची शिफारस केली, तुम्ही सभापती झालात, सत्ता भोगली. आता त्यावेळी दिलेल्या शब्दानुसार स्थायी समिती सदस्यपदासाठी माझे नाव देण्याऐवजी पुन्हा स्वतःचे नाव कसे दिले. जनाची नाही तर मनाची बाळगा अशा शब्दांत औरंगाबाद महापालिकेतील अपक्ष नगरसेवक कैलास गायकवाड याच्यासह आघाडीतील अन्य नगरसेवकांनी स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांची लाज काढली. गजानन बारवाल गद्दार है अशा घोषणा देत त्यांनी सभापतींच्या दालना बाहेर लावलेली नावाची पाटी उखडून फेकत संताप व्यक्त केला.
औरंगाबाद महापालिकेतील निवृत्त झालेल्या आठ स्थायी समिती सदस्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी महापौरांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. दोन वर्षापुर्वी गजानन बारवाल यांच्यासह 13 नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाखाली स्वतंत्र गट केला होता. अर्थात याचे जनक भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हेच होते.
गजानन बारवाल यांना स्थायी समिती सभापती करण्यासाठी अपक्ष नगरसेवक कैलास गायकवाड यांचा वर्षभर आधीच राजीनामा घेण्यात आला होता. अर्थात तो घेताना दोन वर्षानंतर तुम्हाला स्थायीमध्ये पुन्हा सदस्य करू असा शब्द गायकवाड यांना बारवाल आणि तनवाणी यांच्याकडून देण्यात आला होता. प्रत्यक्षात स्थायी सदस्य निवडीच्या आजच्या प्रक्रियेच्या वेळी गटनेता म्हणून गजानन बारवाल यांनी बंद पाकीटात आपल्या गटाच्या सदस्यांची नावे भाजप गट नेते प्रमोद राठोड यांच्या मार्फत महापौरांकडे सोपवली. सभागृहात बारवाल उपस्थित नसतांना महापौरांनी बंद पाकीट उघडून आघाडीच्या वतीने पुन्हा गजानन बारवाल आणि सत्यभामा शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
महापालिकेत राडा
दरम्यान, दगाफटका झाल्याची कुणकुण कैलास गायकवाड, गोकुळ मलके, राहुल सोनवणे यांच्यासह इतर आघाडीच्या नगरसेवकांना लागली होती. त्यामुळे सभागृहात न येता दालनात बसून असलेल्या गजानन बारवाल यांना गाठत आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरले. "दिलेला शब्द कसा फिरवला' तुमच्यासाठी मी वर्षापूर्वी मुदतीआधीच राजीनामा दिला पण तुम्ही मात्र दिलेला शब्द पाळला नाही. दुसऱ्या कुणाचे नाव तुम्हाला सुचले नाही का ? स्वतःचे नाव पुन्हा कसे दिले? असे म्हणत गायकवाड आणि इतर नगरसेवकांनी बारवाल यांना अक्षरशः शिव्या घातल्या.
दरम्यान, महापालिकेत सुरू असलेल्या राड्याची माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे महापालिकेत बारवाल यांच्या दालनात दाखल झाले. तेव्हा तिथे बरीच गर्दी जमली होती. बारवाल मुर्दाबाद, बारवाल गद्दार है अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता. प्रकरण हातघाईवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेत पोलिसांना देखील बोलावण्यात आले होते.
प्रदीप जैस्वाल यांनी कैलास गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांची समजूत काढली आणि त्यांना दालना बाहेर घालवले. शहरातील शंभर कोटी रुपयांचे रस्ते, भूमिगत गटार योजनेची कामे, स्मार्टसिटी अतंर्गत होणारी विकास कामे पाहता महापालिकेच्या तिजोरीची चावी आपल्याच हाती असावी यासाठी महापौर नंदकुमार घोडेले आणि गजानन बारवाल या "भाचे जावई आणि मामे सासरे यांनी' मिळूनच ही खेळी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.