पेण : काश्मीर मधील 370 कलम रद्द केल्याने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. अनेक विरोधी पक्षांनी भाजपच्या या निर्णयाला समर्थन केले; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधात सूर लावला आहे. त्यांची कीव करावीशी वाटते, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पेण येथे पत्रकार परिषदेत केली.
या वेळी माजी मंत्री रविशेठ पाटील, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, प्रवक्ते मिलिंद पाटील, भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, शरद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत ठाकूर म्हणाले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. राज्यसभा व लोकसभा दोन्ही सभागृहात बहुमताने हे विधेयक मंजूर झाले आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न होते. त्यांनी यासाठी मोठे आंदोलन उभारले होते. शेख अब्दुल्ला सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात टाकले. तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप आहे. त्यांचे व प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.
जनसंघ व भाजपने प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा उचलून धरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत दाखवून कश्मीरमधील 370 कलम रद्द केले आहे. अनेक पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. 370 कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे मान्य नाही का? असा प्रश्न आमदार ठाकूर यांनी या वेळी उपस्थित केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.