राज्य

भाजपला काँग्रेसविषयी सद्भावना : जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत संभ्रम पसरवुन त्यांना नामोहरम करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरु आहे. याउलट काँग्रेसविषयी मात्र त्यांना सद्नभावना दिसते. त्यामुळे निष्क्रीय न राहता सरकारविरोधात आपण सर्व ताकदीने उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. मावळते प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत अडकल्याने गेल्या सात महिन्यांपासून ते नाशिकला आले नव्हते. त्यामुळे पक्षात मरगळ आली होती. आव्हाड यांनीही आपल्याकडे वेळ नसल्याने जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली होती.

आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव व अन्य पदाधिका-यांसह पदाधिका-यांची बैठक होऊन त्यात पाटील यांनी संघटनात्मक कामकाजाची माहिती घेतली.प्रत्येक प्रभागात, ग्रामीण भागात गावात कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार सर्वश्री  दीपिका चव्हाण, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, उत्तमबाबा भालेराव, माजी खासदार माधवराव पाटील, माजी खासदार  देवीदास पिंगळे, डॉ. भारती पवार, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, विजयश्री चुंभळे यांसह असंख्य पदाधिका-यांनी गर्दी केली होती.

राज्यव्यापी आंदोलन होणार
सरकारचे अपयश, महागाई अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीतर्फे 1 ऑक्‍टोबरला राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा होईल. 2 ऑक्‍टोबरला सभासद नोंदणी अभियानाची सुरवात होईल. 3 ऑक्‍टोबरला मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT