Prithviraj Chavan
Prithviraj Chavan 
राज्य

सरकार अस्थीर करण्याचा राज्यपालांसह भाजपचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : राज्य सरकार स्थिर आहे. ते अस्थीर करण्याचा प्रयत्न भाजपसह राज्यपाल भगवान कोशारी करत आहेत. कोरोनाच्या काळातील स्थितीचा भाजपकडून राजकीय फायदा उठविण्याचा होणारा प्रयत्न अत्यंत वाईट आहे. त्यातून भाजपला काहीही साध्य होणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

श्री. चव्हाण यांनी आज कऱ्हाडात पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, ""कोरोनामुळे राज्यात स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत राजकीय षडःयंत्र आखले जात असेल व त्या स्थितीचा भाजपही फायदा उठवत असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. राज्यात कोरोनाच्या संकटाशी सामना सुरू आहे. त्यात राज्याचे काम अत्यंत चांगले आहे. मात्र, कोरोनाच्या काळातील गंभीर स्थिती सावरण्यासाठी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे सोडून भाजप राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुराचे राजकारण करु नका, असे आवाहन केले होते. तेच फडणवीस आता कोरोनाच्या स्थितीत सरकारची साथ देण्याचे सोडून आंदोलन करताहेत. राज्य अस्थीर असल्याचे भासवत आहेत. भाजपने राज्याला सावरण्याचे सोडून सुरू केलेले राजकारण बंद करावे.'' राज्यपालांनी आत्तापर्यत ज्या पद्धतीने निर्णय दिले. त्यावरून त्यांची भुमिका संशयास्पद वाटते. 
राज्यपालांची भुमिका भाजपला साथ देणारी आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकी वेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबतची त्यांची भुमिका शंकास्पद होती.

आत्ताही राज्यात मोठी गंभीर स्थिती असतानाही सरकारला साथ देण्याचे सोडून त्या स्थितीचा फायदा भाजपला कसा होईल, यासाठी त्यांची धडपड दिसते, अशी टीकाही त्यांनी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार अनुभवी आहेत. सल्ल्यासाठी त्यांना कोणी बोलवले, तर त्याची वेगळी चर्चा होण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही काल त्यांच्याशी काही महत्वाच्या मुद्दावर चर्चा केली. मात्र, सरकार स्थीर आहे का, अशी होणारी चर्चा निरर्थक आहे, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोरोनाचा आजार जागतिक महामारी आहे, जाहीर केले. मात्र, भारतात 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू झाला. त्यात दहा दिवसांचा कालवधी वाया गेला, अशी टीका करून ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे हा उशिर झाला. कारण या नेतृत्वाने महामारीकडे गांभीर्याने पाहिले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात ते मग्न होते. त्यांना मध्य प्रदेशचे सरकार पाडायचे होते. त्यांना सीएए विरूद्धचे आंदोलन मोडायचे होते, अशी बरीच कारण आहेत, ज्यात ते मग्न होते.''

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने पावले उचलली जात आहेत. राज्याने देशात सगळ्यात जास्त स्वॅब घेतले आहेत. त्यामुळेच देशात सर्वाधिक बाधितांची संख्या महाराष्ट्राची आहे. अन्य ठिकाणी कोरोना तापसणीचे प्रमाण फारच कमी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये 18 ते 19 लाख कोटींची केवळ अश्वासने दिली आहे. प्रत्येकाला रोख पैसे देण्याची कोणतीच योजना त्यात नाही. केवळ कर्जावर अश्वासने दिली आहेत. त्यामुळे ते प्रोत्साहनपर पॅकेज हा केवळ पोकळ वासा आहे, अशी टिकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या कोरोना पॅकेजवर केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT