Congress Mla Dhiraj Deshmukh- PM Narednra Modi News Latur
Congress Mla Dhiraj Deshmukh- PM Narednra Modi News Latur 
राज्य

शेतकऱ्यांचे हाल करणारे केंद्र सरकार असंवेदनशील

सरकारनामा ब्युरो

लातूर : केंद्र सरकारने लोकशाही बाजूला सारत बहुमताच्या जोरावर जाचक कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढ भारतीयांवर लादली आहे. महागाई तातडीने कमी करा, शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या, ही लोकभावना आहे. केंद्र सरकारने आपले आडमुठे धोरण सोडून या लोकभावनेचा आदर करावा, असे आवाहन काॅंग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केले. जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही देशमुख म्हणाले.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. लातूर येथे काँग्रेस भवनासमोर या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी एकदिवसीय उपोषण करत केंद्र सरकारच्या अन्यायकारक निर्णयांचा विरोध करण्यात आला. महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,आमदार धिरज  देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  हे उपोषण करण्यात आले.

यावेळी धिरज देशमुख म्हणाले,  केंद्र सरकारने अचानक शेतकरी विरोधी काळे कायदे केले. त्यामुळे देशातील जनतेची भूक भागवणाऱ्या शेतकरी बांधवाना रस्त्यावर उतरावे लागले. पण, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्यांचे म्हणणे अद्याप गांभीर्याने घेतले नाही. शेतकऱ्यांचे हाल केले. यातून केंद्र सरकारची असंवेदनशीलता दिसून येते.

केंद्र सरकार हे शेतकरी, कामगार यांच्या विरोधात कायदे करत आहे. तर दुसरीकडे महागाई वाढवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातून त्यांना त्वरित दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार आपले आडमुठे धोरण जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा  राहूल गांधी,  प्रियंका गांधी, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सुरुच राहील, असा इशारा देखील देशमुख यांनी दिला. 

लोकशाही संपवण्याचे काम- बागवे

देशात शेतकरी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करत आहे. पण, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप रमेश बागवे यांनी केला. शेतकरी, बाजार समित्या, कामगार, सर्वसामान्य जनतेच्या विरोधी कायदे करुन लोकशाही संपवली जात आहे. लाॅकडाऊन व जीएसटीमुळे लहान मोठे व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यांना आधार देण्याऐवजी 'अच्छे दिना'च्या विरोधातच मोदी सरकार धोरण राबवित असल्याटी टीका बागवे यांनी यावेळी केली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT