Devendra Fadanvis
Devendra Fadanvis 
राज्य

केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केंद्र सरकार राज्याला मदत करीत नाही, असे आरोप राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने केले जातात, ते चुकीचे आहेत. केंद्रानेच या काळात महाराष्ट्राला लशीसंदर्भात सर्वाधिक मदत केली, असे माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले.

फडणवीस काल अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. येथे त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कोविड रुग्णालयाच्या डॉक्‍टरांसोबत एका बैठकीत चर्चा केली. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमरावतीच्या परिस्थितीसंदर्भात त्यांनी येथील रुग्णांची वाढती परिस्थिती लक्षात घेता, ऑक्‍सिजन आणि औषधोपचाराची परिस्थिती ‘नेक टू नेक’ असल्याचे सांगितले. रेमेडेसिव्हिरचा पुरवठा आणि लसीकरणाची येथे कमतरता आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यासमोर हे सर्व विषय मांडले जातील. कोविड रुग्णालयातील डॉक्‍टर सव्वा वर्षांपासून सातत्याने मेहनत घेत आहेत. त्याबद्दल त्यांनी येथील डॉक्‍टरांचे कौतुक केले. देशात कोव्हॅक्‍सिन आणि कोविशिल्ड लशींचे उत्पादन वाढते आहे. त्यामुळे १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना सहजतेने येत्या काळात लस मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर नव्वद कोटी लोकांचे लसीकरण शक्‍य होईल.

नागपूरसाठी २०० व्हेंटिलेटर व ५०० कॉन्सन्ट्रेटर
शहरात दोनशे व्हेंटिलेटर आले असून लवकरच पाचशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी समस्या दूर होणार असून ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सीएसआर फंड अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ऑक्सिजन प्रकल्पासाठी १५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. 

पाच रुग्णालयांनासुद्धा सीएसआरमधून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प तयार करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ऑक्सिजनची दोनशे टन प्रति दिवस वाहतूक होईल, याची जबाबदारी नागपुरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांच्या कंपनीला देण्यात आली आहे. ऑक्सिजन वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून तीन हजार सिलिंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT