चंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सध्या भाजप, काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल वित्त आणि बांधकाम समितीची सभा पार पडली. नेहमी गाजणारी वित्त समितीची सभा शांततेत पार पडली. मात्र, बांधकाम समितीच्या सभेत सत्ताधा-यांना घरचा आहेर देण्यात आला.
जिल्हा परिषदेत आज वित्त आणि त्यानंतर बांधकाम समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. वित्त समितीची सभा सभापती संतोष तंगडपल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूरकर, पृथ्वी अवताडे यांच्यासह अन्य सदस्य होते. या सभेत महिला व बालकल्याण विभागाच्या सौरऊर्जा संचाचा मुद्दा डॉ. सतीश वारजूरकर यांनी उपस्थितीत केला. सौरऊर्जा संचासाठी एकदा नव्हे तर तब्बल तीनदा निविदा निघाल्या.
मर्जीतल्या पुरवठादाराला काम मिळावे, यासाठी खटाटोप सुरू आहे. या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवून काहींनी आक्षेप नोंदविले. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या निविदा प्रक्रियेत अनियमितता आहे. त्यामुळे ती रद्द करण्याची मागणी डॉ. सतीश वारजूरकर यांनी केली. यावर सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. हा एकमेव मुद्दा वगळता वित्त समितीची सभा तशी शांततेत पार पडली.
त्यानंतर चार वाजताच्या सुमारास बांधकाम समितीच्या सभेला सुरवात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, मारोती गायकवाड, प्रमोद चिमुरकर, गजानन बुटके यांच्यासह अन्य सदस्य उपस्थितीत होते. या सभेत जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड यांनी विकासकामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून सभापती तंगडपल्लीवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून मारोती गायकवाड यांची कामे अडवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी बांधकाम समितीच्या सभेत संताप व्यक्त केला.
सदस्यांत खदखद
जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी गटातील सदस्यांना २५-१५ या शीर्षकाखाली निधी मिळाला नाही. तसेच खनिज विकास निधीतूनही त्यांना निधी मिळाला नाही. सुरुवातीला निधी देण्यात येणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले. मात्र, अद्याप हा निधी सदस्यांना मिळाला नाही. आता निधी खर्चच झाला नाही. तो परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील काही सदस्यांत नाराजीचा सूर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.