cm udhav thackeray news aurangabad
cm udhav thackeray news aurangabad 
राज्य

मुख्यमंत्री बाहेर पडले, लवकरच औरंगाबाद दौरा करणार

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत बसूनच काम करतात, कोरोनाच्या संकटात ते बाहेर फिरलेच नाही अशी टिका विरोधकांकडून सुरू आहे. यातच आज उद्धव ठाकरेंनी पुण्यात येऊन आढावा बैठक घेतली. आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ते मराठवाडा दौऱ्यावर देखील येणार असल्याची माहिती आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतांनाही मुख्यमंत्री फिरत नाही या टिकेला ठाकरे यांनी पुण्यातील दौऱ्याने उत्तर दिले आहे.

कोरोनाच्या संकटात सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले गेले, विरोधकांच्या टिकेला देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वेळोवेळी पहायला मिळाले. एवढेच नाही तर आघाडी सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली होती.  कॅप्टन म्हणून मुंबईतून कोरोनाची परिस्थिती व त्यासाठी आवश्यक निर्णय उद्धव ठाकरे घेत आहेत, त्यचे कोरोनाच्या परिस्थितीवर बारकारईने लक्ष असल्याचे सांगितले होते. 

शरद पवार आपला औरंगाबाद दौरा आटोपून परतत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी पुण्याचा दौरा जाहीर केला होता. त्यानूसार अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. आता मुंबईच्या बाहेर पडलेले मुख्यमंत्री राज्याच्या काही भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार उद्धव ठाकरे आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत.

औरंगाबादेतूनच ते मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा साडेतेरा हजारांच्यावर गेला आहे, तर आतापर्यंत या महामारीने ४६४ जणांचे बळी घेतले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्‍सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला होता. या शिवाय कोरोना चाचणी प्रयोग शाळा व चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाचे उद्घघाटन देखील उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन पध्दतीने केले होते.

फुड पार्कचे भूमिपूजन..

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जानेवारीमध्ये औरंगाबादेत आले होते. मराठवाडा चेंबर्स आॅफ कॉमर्सने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. तेव्हा बिडकीने येथे पाचशे एकर जागेत फूड पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मराठवाडा दौऱ्यात या फुड पार्कचे भुमीपूजन उद्धव ठाकरे करण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई या फुडपार्कच्या आराखड्यावर नजर ठेवून आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT