cm udhav thackeray press conference news osmanabad
cm udhav thackeray press conference news osmanabad 
राज्य

थिल्लर, चिल्लरांकडे पहायला मला वेळ नाही...

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद ः  मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये, थेट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी अशा थिल्लर आणि चिल्लरांकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले असते तर आज तेलंगणा सारखीच मदत आपणही शेतकऱ्यांना करू शकलो असतो, असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या उस्मनाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. पाहणी केल्यानंतर उस्मानाबादेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. सुरूवातीलाच फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर थिल्लरपणा करू नये या केलेल्या टिकेकडे ठाकरेंचे लक्ष वेधले. यावर मला अशा थिल्लर आणि चिल्लर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे सांगत फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांत पाणी येऊ देणार नाही. पंचनाम्याचे काम् जवळपास पुर्ण झाले आहेत. मुंबईत किती मदत द्यायची, कशी द्यायची या संदर्भात काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करतांना देखील ठाकरे यांनी भाजपला मित्रत्वाचा सल्ला दिला.

एकनाथ खडसे सारखा जुना आणि ज्याचा पक्षाच्या वाढीमध्ये मोठा वाटा आहे, असा सच्चा माणूस जर पक्ष सोडून जात असेल तर भाजपच्या नेत्यांनी याचा विचार करायला हवा. यशाच्या शिखरावर असतांना पाया खालचे दगड का सरकतायेत याचा देखील विचार केला पाहिजे.

भाजप आमचा कधीकाळी मित्रपक्ष होता, मित्र म्हणून माझा त्यांना हा सल्ला आहे. शिवसेना-भाजपची युती होती तेव्हा ती अबाधित राखण्यात ज्या गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांनी प्रयत्न केले होते, त्या एकनाथ खडसे यांचे देखील नाव होते. आज ते राष्ट्रवादी पक्षात जात असले तरी महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत याचा आनंद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT