Congress state Commitee news Aurangabad
Congress state Commitee news Aurangabad 
राज्य

मराठवाड्यातील नव्या-जुन्याची सांगड घालत काॅंग्रेसने साधला समतोल..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः काॅंग्रेसने जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारणीत मराठवाड्याला चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे. सोशल इंजिनिअरिंगसह जुन्या-नव्याची सांगड घालत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समतोल साधल्याचे देखील यावरून दिसून आले. प्रदेश कार्यकारणीच्या कार्यकारी अध्यक्ष तेसच उपाध्यक्ष पदावर मराठवाड्यातील दोघांची वर्णी लागली आहे. बसवराज पाटील यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांसोबतच आता कैलास गोरंट्याल, एम.एम. शेख यांना देखील राज्यपातळीवर संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसमध्ये बदल होणार याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. पण मध्यंतरीच्या काळात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच कायम ठेवणार असल्याचे बोलले गेले. परंतु काॅंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे पाहता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा द्यायला लावून, त्यांच्यावर राज्याची जबादारी सोपवण्यात आली. विशेष म्हणजे कार्यकारी अध्यक्ष नेमत पटोले यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न देखील काॅंग्रेस नेतृत्वाने केला आहे.

राज्यातील काॅंग्रेसच्या यश आणि वाटचालीत मराठवाड्याचा वाटा नेहमीच मोठा राहिला आहे. त्या तुलनेत मराठवाड्याला नेतृत्व करण्याची संधी आणि सत्तेतील वाटा देखील मुबलक मिळाला. आज जाहीर झालेल्या काॅंग्रेस प्रदेश कार्यकारणी व उपाध्यक्ष पदाच्या नियुक्तीत मराठवाड्याला झुकते माप देण्यात आले आहे. काॅंग्रेस संसदीय समितीत अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, रजनी पाटील, राजीव सातव, अमित देशमुख यांचा समावेश कायम आहे.

तर प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी माजी आमदार बसवराज पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मराठवाड्यातून कार्यकारी अध्यक्ष पदाची एकमेव संधी मिळालेले ते नेते आहेत. राहूल गांधी यांचे विश्वासू आणि गेली अनेक वर्ष काॅंग्रेसमध्ये कार्यरत असलेले बसवराज पाटील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून पराभूत झाले होते. पक्षाने त्यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोपवत विश्वास दर्शवला आहे.

या शिवाय मराठवाड्याला दोन प्रदेश उपाध्यक्ष देखील लाभले आहेत. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल व औरंगाबादचे विधान परिषदेतील माजी आमदार एम.एम. शेख यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  कैलास गोरंट्याल यांना उपाध्यक्ष पद मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

एम.एम.शेख यांची निवड मात्र अनपेक्षित समजली जात आहे. जातीय समतोल साधण्यासाठी त्यांना प्रदेश कार्यकारणीत स्थान देण्यात आल्याचे देखील बोलले जाते. एम.एम.शेख हे गेल्या काही वर्षांपासून काॅंग्रेसमध्ये सक्रीय नाहीत. दिवंगत काॅंग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या काळात शेख यांना विधान परिषदेत संधी मिळाली होती.

शिवाय त्यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एकाद निवडणूक देखील लढवली होती. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले.  देशमुख यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख राहिली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर एम.एम.शेख हे पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि एमआयएमचा शहरातील वाढता प्रभाव पाहता त्यांची निवड महत्वाची समजली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT