Nana Patole
Nana Patole Sarkarnama
राज्य

'भाजप व आरएसएसला त्याग, शौर्य व बलिदानाचे महत्व कसे कळणार?'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारी ५० वर्षांची शौर्यगाथा पुसून टाकण्याचे पातक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) केले आहे. वीर जवानांच्या शौर्याची साक्ष देणारी दिल्लीतील 'अमर जवान ज्योत' कायमची विझवण्याचा अश्लाघ्य प्रकार करुन मोदी सरकारने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला आहे. हा अपमान देश कदापी सहन करणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

पटोले म्हणाले, या देशाला त्याग, शौर्य व बलिदानाचा मोठा इतिहास आहे. हजारो वीर जनावांच्या अतुलनिय शौर्याची प्रेरणा करोडो जनतेच्या मनात तेवत रहावी, त्यातून स्फूर्ती मिळावी यासाठी अमर जवान ज्योती सारखी स्मारके उभे केली जातात पण केंद्रात सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विचाराच्या सरकारला या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? त्यांना तर असा कोणताही गौरवशाली इतिहास नाही. मात्र, जो गौरवशाली इतिहास आहे तो पुसण्याचा कृतघ्नपणा भाजपा सरकार करत आहे. 'अमर जवान ज्योत' विझवण्यासाठी देण्यात आलेले कारणसुद्धा अत्यंत तकलादू व बालिशपणाचे आहे, अश्या शब्दात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ साली पाकिस्तानला धडा शिकवत दोन तुकडे केले व जगाच्या नकाशावर बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी ही 'अमर जवान ज्योत' विझवून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान पुसण्याचे पातक संघ विचाराचे सरकार करत आहे. परंतु त्यांच्या अशा कृतीने त्यांचे योगदान पुसले जाऊ शकत नाही आणि वीर जवानांनी देशासाठी दिलेले बलिदानही विसरले जाऊ शकत नाही.

बांग्लादेश मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही एवढा कोतेपणा त्यांनी दर्शवला होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना त्यात स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी अमुल्य योगदान दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचाही उल्लेख केंद्रातील भाजपा सरकारने टाळला. आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व देशाच्या जडणघडणीत काडीचेही योगदान नाही. ते नेहरू गांधी यांचे योगदान नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपा सरकारने आज विझवलेली ज्योत देशवासियांच्या मनात कायम तेवत राहील, अशी टीका पटोलेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT