Corona
Corona 
राज्य

पिता-पुत्राच्या प्रेमात कोरोना आला आडवा

सरकारनामा ब्युरो

राहुरी : मालाड (मुंबई) येथील 57 वर्षीय एकजण दुचाकीवर थेट राहुरीत आला. मात्र, वडिलांनी त्यास घरात प्रवेश नाकारला. त्यांनी दोन रात्री घराबाहेर काढल्या. येथे "होम क्वारंटाईन'चा शिक्का हातावर बसला. मात्र, येथील निवारा केंद्रात थांबण्याऐवजी त्यांनी मुंबईची परतीची वाट धरली. राहुरी फॅक्‍टरी येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. प्रशासनाला कळविले. अखेर त्यांची रवानगी नगरच्या जिल्हा रुग्णालयात झाली. 

राहुरी फॅक्‍टरी येथे बसस्थानकासमोर चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांसाठी पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची सोय केली आहे. आज दुपारी साडेतीन वाजता राहुरीहून आलेल्या दुचाकीस्वारास त्यांनी अडविले. पाणी पिण्याचा आग्रह धरला. त्याच वेळी दुचाकीस्वाराच्या हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का दिसला. कार्यकर्ते सावध झाले. त्यांनी त्याला अडविले. प्रशासनाला कळविले.

संबंधित व्यक्तीने सांगितले, की ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट (मुंबई) येथे वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. मालाड येथे एकटेच राहतात. पत्नी व मुले स्वतंत्र राहतात. तनपुरेवाडी रस्ता (राहुरी) येथे वृद्ध वडील राहतात. त्यांच्या हृदयावर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी (ता. 24) सकाळी मालाडहून घोटीमार्गे दुचाकीवर रात्री 11 वाजता राहुरीत आले. मात्र, वडिलांनी कोरोनामुळे शेजाऱ्यांच्या भीतीने त्यांना घरात घेतले नाही. त्या रात्री एका मंदिराच्या पायऱ्यांवरच त्यांनी मुक्काम केला. काल शनिवारी (ता. 25) संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील अन्नछत्रात जेवण केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का मारला. रात्रीचा मुक्काम राहुरी बसस्थानकात केला. आज आल्यामार्गी परतण्याचे ठरविले होते. मात्र, तत्पूर्वी त्यांना कार्यकर्त्यांनी अडविले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ, केंद्रप्रमुख किसन माने, होमगार्ड महेश शिंदे, रोहित गडाख तत्काळ घटनास्थळी आले. डॉ. मासाळ यांनी रुग्णवाहिका बोलावून मुंबईच्या पाहुण्यांची रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात केली.

राहुरी फॅक्‍टरी येथे अडविलेल्या व्यक्तीच्या हातावर "होम क्वारंटाईन' शिक्का मारला आहे. त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, मालाड (मुंबई) हे हॉट स्पॉट असून, तेथून ते आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
- डॉ. अण्णासाहेब मासाळ, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, देवळाली प्रवरा  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT