corona efect all partys mp,mla together news
corona efect all partys mp,mla together news 
राज्य

कोरोना हाताबाहेर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आले एकत्र..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः जिल्‍ह्यातील कोरोना आता हाताबाहेर गेला आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हे उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. इतके महिने आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवून त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. परंतु आता परिस्थीती हाताबाहेर जात आहे.  शहर आणि जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ज्या गोष्टी सूचवाव्या वाटतात, त्या आम्ही उद्या विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि घाटीच्या अधिष्ठांत्याच्या बैठकीत मांडणार आहोत, असे स्पष्ट करत दोन खासदार आणि पाच आमदारांनी आज एकत्रत बैठक घेतली.

गेल्या तीन महिन्यापासून शहर आणि आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थीती अतिशय गंभीर झाली आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ती अडीचशेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ३८८६ म्हणजेच चार हजाराच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभुमीवर सुभेदारी विश्रामगृहात आज शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड,  इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, सतीश चव्हाण यांनी बैठकीत सहभाग नोंदवला.

दिवसेंदिवस बिघडत चाललेली कोरोनाची जिल्ह्यातील परिस्थिती, प्रशासनातील सावळा गोंधळ आणि आता नव्याने करावयाच्या उपाय योजना यावर बैठकीत चर्चा झाली. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हा पासून संपुर्ण परिस्थिती आरोग्य, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हाताळत आली आहे. पण तीन महिने उलटून गेल्यानंतरही या सर्वांना कोरोना रोखण्यात यश आलेले नाही. उलट दगावणाऱ्या व बाधिंताच्या संख्येत वाढच होत आहे.

प्रशासनामध्ये नसलेला समन्‍वय हे यामागचे प्रमुख कारण असल्याचा सूर लोकप्रतिनिधींनी काढला. लोकांच्या आरोग्यचे रक्षण करून शहर व जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून हस्तक्षेप करण्याचा अधिकार असूनही आम्ही तो केला नाही. कारण उद्या प्रशासनाने या सगळ्याचे खापर आमच्यावर फोडले असते. आम्ही प्रशासनाला संपुर्ण स्वातंत्र्य दिले होते, पण त्यांना कोरोनाचा संसर्ग रोखता आला 
नाही ही वस्तुस्थिती आहे.

लोकांना मरतांना पाहू शकत नाही..

आयुक्तांच्या चालकालाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे आयुक्तही आता क्वारंटाइन होणार असल्याचे कळते. मग जर तुम्हाल स्वतःचे कोरोनापासून रक्षण करता येत नसेल, तर तुम्ही सर्वसामान्याचे जीव कसे वाचवणार? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. एखादा वरिष्ठ अधिकारी जर स्वतः क्वारंटाइन होऊन घरात बसणार असेल तर मगे हे शहर कुणाच्या भरवशावर सोडायचे.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तीनही आयुक्तांचे निर्णय हे परस्परविरोधी असतात हे जगजाहीर झाले आहे. त्यामुळे यांच्या गलथानपणामुळे आम्ही आता लोकांना मरतांना पाहू शकत नाही. म्हणून उद्या, विभागीय आयुक्तांकडे होणाऱ्या बैठकीत आम्ही सगळ्या गोष्टी समोर आणू आणि यावर ठोस निर्णय घ्यायला, प्रशासनाला भाग पाडू, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

प्रशासनावर आरोप नाही, पण हे थांबायला हवे..

तीन महिन्यापासून शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहे, कोरोनाचा संसर्ग रोखून दगावणाऱ्यांचे प्रमाण कमी करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. पण आज जी परिस्थिती आहे, त्यावरून त्यांनी कसे काम केले हे वेगळे सांगायला नको. वेळोवेळी आमच्या निदर्शनास अनेक गोष्टी येत होत्या, त्या आम्ही प्रशासनासमोर मांडतही होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

प्रशासनाने काहीच केले नाही, असा आमचा आरोप नाही, पण ते कुठेतरी कमी पडले हे नाकारून चालणार नाही. कोरोनामुळे खूप नुकसान झाले आहे, अनेकांनी आपले प्राण गमावले, पण आता हे थांबायला हवे आणि त्यासाठीच आम्ही उद्या एकत्रित बसून यावर मार्ग काढणार आहोत, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT