Declare Pratapgad, Ajinkyatara Fort as National Monument; Udayanraje's demand to the Vice President 
राज्य

प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

महाराजांच्या गनिमीकाव्याचा इतिहास प्रतापगडाच्या रूपाने जतन करावा. जेणेकरून तो साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी प्रतापगडला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी उदयनराजेंनी उपराष्ट्रपतींकडे केली.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी अजिंक्यतारा, प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन केली. 

यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आदर व्यक्त केला. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिकृती उपराष्ट्रपतींना भेट दिली.

व्यंकय्या नायडू यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सांगून महाराजांच्या पराक्रमाचा अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण देशात पाहायला मिळत असल्याचे उदयनराजेंनी निदर्शनास आणून दिले. उदयनराजे म्हणाले, तसाच वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राजाच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. तोच वारसा जतन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

सातारा जिल्ह्याला सुमारे २० किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच १८ धरणांची देणगीसुद्धा सातारा जिल्ह्याला मिळाली आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्कीचा प्रकल्प हा सुद्धा साताऱ्यात आहे. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वीजेच्या मागणीपैकी जवळपास ३० टक्के वीज निर्मिती ही साताऱ्यात होते. तशीच संपूर्ण देशात पर्यटनामध्ये अव्वल स्थानावरचे महाबळेश्वरसारखे थंड हवेचे ठिकाणसुद्धा सातारा जिल्ह्याला लाभले आहे.

याच महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी जगाच्या नकाशावर आली आहे. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे रंगबिरंगी फुलांनी बहरून जाणाऱ्या कास पठाराला जागतिक वारसा लाभला आहे. अशा विविधतेने नटलेल्या सातारा जिल्ह्याची शान वाढवणारे प्रतापगड आणि अजिंक्यतारा हे दोन्ही किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित करण्याची मागणी आम्ही आपल्याकडे करत आहोत. 

मराठा साम्राजाची राजधानी असलेल्या सातारा येथील अजिंक्यतारा किल्याला फार मोठे ऐतिहासिक महत्व आहे. सातारा शहरात मोठ्या डौलाने उभा असलेला हा किल्ला जतन करण्याची उदयराजेंनी मागणी केली. त्याचबरोबर प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही मराठा साम्राजाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अदिलशहाचा सेनापती अफझल खानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट परतवून लावताना, त्याचा शेवट करून याच मातीत त्याची कबर बांधली.

तर स्वराज्याची निर्मिती सुद्धा झाली नसती....

या लढाईत महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला संपवले नसते तर इतिहास कदाचित वेगळा इतिहास पाहायला मिळाला असता. इतकच नाही तर स्वराज्याची निर्मिती सुद्धा झाली नसती. आणि या देशातील लोकशाही पाहायला मिळाली नसती. त्यामुळे महाराजांच्या गनिमीकाव्याचा इतिहास प्रतापगडाच्या रूपाने जतन करावा. जेणेकरून तो साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी प्रतापगडला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी उदयनराजेंनी उपराष्ट्रपतींकडे केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT