Horse
Horse 
राज्य

कलेक्टरच्या तंबीनंतर घोडा पार्किंगची ‘त्या’ अधिकाऱ्याची मागणी मागे

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. बव्हंशी राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केलेली आहे. अशा परिस्थितीत एका शासकीय अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना मागितली. पण ती पेट्रोलच्या वाढलेल्या दरांमुळे नव्हे तर पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे. 

अशी अजबगजब मागणी करणारे हे अधिकारी आहेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे दुचाकी वाहनाने कार्यालयात येण्यास मला त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, ही विनंती.’ अशा आशयाचे पत्र मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. 

पेट्रोलचे दर प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे देशमुख यांनी ही मागणी केली असावी, असा समज सुरुवातीला संबंधितांचा झाला होता. पण पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी इटनकर यांनी त्या अधिकाऱ्याला तंबी दिल्याची माहिती आहे. या दरम्यान हे पत्र सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले. पेट्रोलच्या दरवाढीमुळेच ही मागणी केली असल्याचा समज नेटकऱ्यांचाही झाला होता. पण पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्याचा उल्लेख पत्रात वाचल्यावर लोकही बुचकळ्यात पडले. मग प्रश्‍न असा उपस्थित झाला की, कदाचित नांदेड शहरातील रस्ते खराब असतील आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्याला दुचाकीवरून येण्यास त्रास होत असावा. पण तशीही स्थिती नाहीये. 

नांदेड ग्रामीणमधील रस्ते खराब आहेत. पण शहरातील आणि त्यातल्या त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते चांगले आहेत. त्यामुळे काहीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने त्या अधिकाऱ्याने अशी मागणी केली असावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोलले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला तंबी दिल्यानंतर त्याने आपला मागणी परत घेतल्याचे सांगण्यात आले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT