Traffic Police Sarkarnama
राज्य

वाहनचालकांनो खबरदार... आता हेल्मेट नसेल तर लायसन्स रद्द होणार!

मोटार वाहन कायदा २०१९ मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Rule Violation) करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. काही ठराविक नियमांचे उल्लंघन केल्यास तीन महिन्यासाठी वाहन परवाना देखील निलंबित केला जाणार. तसेच, यापुढे नियमाचे काटेकोरपणे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मोटार वाहन कायदा २०१९ मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती. या बदलाची 1 डिसेंबरपासून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे. हेल्मेट नसल्यास पूर्वी ५०० रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते. मात्र, आता दंडाच्या रकमेत वाढ करीत तीन महिन्यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड होता. आता तो थेट पाच हजार रुपये करण्यात आला आहे. सीटबेल्ट नसल्यास पूर्वी २०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता तो एक हजार रुपये करण्यात आला आहे.

मोबाईल वापरला तर एक ते पाच हजार दंड

धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यास त्यातून होणाऱ्या अपघातामुळे निरापराधांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांना एक ते पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांना देखील या तरतुदीनुसार दंड केला जाणार आहे.

दंडाचा प्रकार - आधीचा दंड - नवीन दंड

परवाना नसताना वाहन चालविणे - ५०० - ५०००

- परवाना रद्द असताना वाहन चालविणे - ५०० - १००००

- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी व तीनचाकी) -१००० - १०००

- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (जड वाहने) - १००० - १००० ते ४०००

- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार ) - १००० - १००० ते २०००

- वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास - १००० -१००० ते ५०००

- ओव्हरलोड - २०००० (प्रतिटन)

- सीटबेल्ट नसणे - २०० - १०००

- ट्रीपल सिट - २०० - १०००

- विना हेल्मेट प्रवास - ५०० - १०००

- मोठ्या आवाजाचे हॉर्न - ५०० - १०००

- अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांना अडवणे -१०,०००

- वाहनात बदल केल्यास : १००० (प्रत्येक बदलासाठी २०००)

याबाबत राज्य परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून वाढीव दंड आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरटीओचे अधिकारी व पोलिसांच्या कारवाईमुळे बेशिस्तीपणे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT