3shivaji_20kardile.jpg 
राज्य

दुधवाला शिवा असा झाला सरपंच ! जुन्या आठवणीत रमले शिवाजी कर्डिले

मी रोज सकाळी त्यांना दूध द्यायचो. ते करीत असताना ओळखी झाल्या. हळूहळू बुऱ्हाणनगरच्या लोकांचे प्रश्नही या अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडवू लागलो.

मुरलीधर कराळे

नगर ः ``मी रोज सायकलवर दूध घालायचो. नगरमधील अधिकारी, पदाधिकारी माझे गिऱ्हाईक. त्यांच्या माध्यमातून लोकांचे कामे व्हायचे. राजकारणाचा गंध नव्हता. कसं लढायचं याचाही पत्ता नव्हता. ग्रामपंचायतची निवडणूक आली. लोक म्हणाले, शिवा ऱ्हा उभा. मी म्हटलं नको. मला काय कळंतंय त्यातलं. पण लोकांचा आग्रह झाला अन मी बिनविरोध सरपंच झालो. राजकारण माझ्या मनी ना ध्यानी, पण सरपंचपदाची आयती माळ माझ्या गळ्यात येऊन पडली,`` या आठवणीत आज भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले रमले.

सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याबाबत पहिल्यांदा सरपंच झाल्याच्या आठवणी सांगताना कर्डिले भूतकाळात गेले. सरपंचपदापासून सुरू झालेले राजकारण कर्डिले यांना 25 वर्षे आमदारकी देऊन गेले. मंत्रीपद देऊन गेले. महाराष्ट्रात राजकारणात एक मुरब्बी राजकारणी ही बिरुदावली त्यांच्यामागे लागली. हा प्रवास थक्क करणारा ठरला. सध्याही कर्डिले राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पहिल्यांदा सरपंच झाल्याबाबत बोलताना कर्डिले म्हणाले, की बुऱ्हाणनगरला आमचा पिढीजात शेती व्यवसाय. दुग्धोत्पादन हा शेतीला जोडधंदा. घरी म्हशीचा मोठा गोठा. त्यामुळे लहाणपणीपासूनच म्हशींच्या धारा काढणे, दुध नगरला विकणे, असे कामे करायचो. पुर्वी गाड्या नव्हत्या. सायकलवर दुधाचे कॅन लटकावयाचे. ते नगरला बाजारात न्यायचे. विविध राजकीय पदाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरचे प्रतिष्ठित लोकांना माझे रतिबाचे दुध असायचे. मी रोज सकाळी त्यांना दूध द्यायचो. ते करीत असताना ओळखी झाल्या. हळूहळू बुऱ्हाणनगरच्या लोकांचे प्रश्नही या अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडवू लागलो. 

माझ्या अधिकाऱ्यांशी ओळखी पाहून लोकही माझ्याकडे अनेक तक्रारी घेऊन यायचे. मी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचे प्रश्न सोडवू लागलो. असे नित्याचेच सुरू झाले. 1984 साली ग्रामपंचायत निवडणूक लागली. ग्रामस्थ म्हणू लागले, `शिवा उमेदवारी अर्ज भर.` त्या वेळी पक्षीय राजकारण जास्त नव्हते. मी म्हटलो,` नको. मला नाही जमायचं ते.` परंतु काहींनी खूपच आग्रह धरला. शेवटी गावातील नऊ सदस्यांची निवड बिनविरोध करायची ठरली. ग्रामपंचायतीला नऊ लोकांनीच अर्ज भरला. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या सदस्यांनी पुन्हा माझी बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली, आणि मी सरपंच झालो. 

निवड झाल्याबरोबर मारुतीच्या मंदिरात गेलो. गावाच्या विकासासाठी गट-तट विसरून राजकारण करण्याची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा पुढील दोन्ही निवडणुकात मला बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले. 

1994 मध्ये मला जिल्हा परिषदेला उमेदवारी करण्याचा आग्रह झाला. त्या वेळी दिवंगत खासदार दादापाटील शेळके यांनी माझ्या विरोधात एक उमेदवार उभे करून आव्हान दिले. त्यामुळे जिल्ह्यातील काही नेत्यांनी मला विधानसभेला शेळके यांच्याच विरोधात उमेदवारी करण्याचा सल्ला दिला. 1995 ला लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी गडाखांनी मला मदत केली. मी आमदार झालो. त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे आमदार म्हणून विधानसभा मतदारसंगातील अनेक कामे करता आली. मंत्रीपदाचीही संधी मिळाली. त्यामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली.

युवकांना असाही सल्ला

युवकांना सल्ला देताना कर्डिले म्हणतात, की राजकारण, समाजकारणातून लोकांची कामे करण्याचा आनंद मिळतो. या क्षेत्रात येऊ इच्छित असलेल्या युवकांनी 24 तास काम करण्याची तयारी ठेवावी. गट-तट विसरून सर्वसामान्यांची कामे करून द्यावीत. त्यांना मदत करावी. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. अडचणीच्या काळात लोकांच्या मागे भक्कमपणे उभे रहावे. हेच आशिर्वाद पुढे कामे येतात. लोक आठवण ठेवतात. जय-पराजय या राजकारणाच्या दोनच बाजू असतात. दोन्हीचीही तयारी ठेवूनच राजकारणात उतरावे. विजय झाला म्हणून हवेत राहू नये, आणि पराजय झाल्यास खचून जावू नये. फिनिक्सप्रमाणे पुन्हा भरारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT