Ncp Mla Satish Chavan Lette to Cm Udhav Thackeray News Aurangabad
Ncp Mla Satish Chavan Lette to Cm Udhav Thackeray News Aurangabad 
राज्य

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याने मेडिकलच्या सर्व परिक्षा पुढे ढकला..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने १९ एप्रिल ते ३० जून या दरम्यान एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या राज्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ होत आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्या आणि मृतांचे प्रमाण पाहता राज्य सरकार राज्यात कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच विविध शैक्षणिक परीक्षा पुढे ढकलाव्यात अशा मागण्या शैक्षणिक संघटना, राजकीय पक्षांकडून पुढे येत आहेत. पुढील आठवड्यापासून घेतल्या जाणाऱ्या मेडिकलच्या परीक्षा देखील पुढे ढकलाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

मात्र सदरील परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आज कोरोना बाधित आहेत. तर परीक्षेला बसता यावे म्हणून लक्षणे असून सुध्दा अनेक विद्यार्थी कोरोनाची चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आज वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी घरी आहेत. मात्र आता या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जावे लागणार आहे.

तसेच वसतिगृहात एका रूमध्ये ३ ते ४ विद्यार्थी राहतात, मेस, वॉशरूमचा वापर या विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे सदरील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय अभ्यासिका देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे सतीश चव्हाण यांनी निवदेनात म्हटले आहे.

सद्यपरिस्थिीतीत सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. आपल्या महाविकास आघाडी सरकारची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नसल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात,अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT