श्रीगोंदे : नागवडे सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात साखर उताऱ्यात जिल्ह्यात बाजी मारली आहे. कारखान्याचा उतारा 10.84 टक्के आहे. आतापर्यंत सुमारे सात लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याचा विस्तार करण्यासाठी स्वतंत्र पाच हजार टनाचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून, तसा प्रस्ताव वार्षिक सभेत मांडणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (गुरुवारी) दुपारी ऑनलाइन होणार आहे. तशा सुविधा कारखान्याने सभासदांना दिल्या आहेत. यंदाच्या गाळपासाठी सभासदांनी कारखान्याकडे 10 हजार हेक्टरची नोंद केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यातील 5595 हेक्टर क्षेत्रावरील ऊसच गाळपासाठी आला. उर्वरित सभासदांनी त्यांचा ऊस इतरत्र पाठविल्याने कारखान्याचे गाळप उद्दिष्टापेक्षा कमी होत आहे. आजअखेर कारखान्याने 6 लाख 91 हजार 454 टन उसाचे गाळप केले असून, 7 लाख 47 हजार 225 साखरपोत्यांची निर्मिती केली आहे.
आसपासच्या कारखान्यांनी त्यांची गाळपक्षमता वाढविल्याने नागवडे कारखानाही तसा विचार करीत असल्याचे सांगून नागवडे म्हणाले, की स्वतंत्र पाच हजार टनाचा प्रकल्प उभारण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे 60 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही होत असून, त्यास अंतिम मंजुरी सभासदांच्या उद्याच्या (गुरुवारी) सभेत घेणार आहोत.
केंद्राने साखरेला 3100 रुपये क्विंटलचा दर ठरवून दिला असला, तरी त्याप्रमाणात साखरेची उचल होत नाही. कारखान्याने 1 लाख 37 हजार क्विंटल साखर निर्यात केली असून, आणखी एक लाख क्विंटल साखर निर्यातीस परवानगी मिळाली आहे. ही साखरविक्री त्वरित होत असल्याने कारखान्याला टनामागे 600 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कारखान्याची सहवीज निर्मितीची चाचणी पूर्ण झाली असून, आजपर्यंत 1 कोटी 23 लाख 60 हजार युनिट वीजनिर्मिती केली आहे. त्यातील 60 लाख युनिट वीज निर्यात केल्याचे नागवडे म्हणाले.
दरम्यान ऑनलाइन सभेसाठी सभासदांना पाठविलेल्या लिंकवरून सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले.
हेही वाचा...
वीजधोरणाबाबत शेतकरी अनभिज्ञ
श्रीरामपूर : कृषिपंपाच्या वीजपुरवठ्याबाबत सरकारने नवीन धोरणाची मोबाईलवर पाठविलेली माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचलीच नाही. अनेक शेतकरी अर्धशिक्षित असल्याने मोबाईलवर आलेली माहिती नीट समजली नाही. त्यामुळे नवीन वीजधोरणाबाबत महावितरण अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.
महावितरणने कृषिपंपाची वीज खंडीत केल्यास, पाण्याअभावी जनावरे दगावण्याची शक्यता आहे. त्यास महावितरणचे अधिकारी जबाबदारी राहतील, असा इशारा बाबासाहेब आरसुले यांनी दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार प्रशांत पाटील, महावितरण उपअभियंत्यांना दिले आहे.
Edited By - Murlidhar Karale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.