ED raid in aurangabad news
ED raid in aurangabad news 
राज्य

औरंगाबादेत ईडीच्या कारवाईत सापडले घबाड..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः भल्या पहाटे शहरातील एका बड्या केटरिंग व्यवसायिकाच्या घरावर टाकलेल्या धाडीत ईडीच्या अधिकाऱ्यांना घबाड हाती लागले आहे. या कारवाईत ईडीने ६२ लाखांची रोख रक्कम व ७ किलो सोने जप्त केले आहे. एकाच वेळी घर आणि कार्यालयावर धाड टाकत अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली. याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून दिली आहे. परकीय चलनाच्या बेकायदेशी व्यवहाराच्या संशावरून ही कारवाई करण्यात आली.

गुरुवारी भल्या पहाटे मुंबईहून ईडीच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांचे पथक गुप्तपणे शहरात दाखल झाले होते. केटरिंग व्यवसायत नावजलेल्या व्यापाऱ्याबद्दल ईडीचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून गुप्तपणे माहिती गोळा करत होते.

संशय बळावल्यानंतर आज पहाटे तीन वाजता दाखल झालेल्या ईडीच्या पथकाने सहा वाजता या व्यापाऱ्याच्या सिडको एन-३ भागातील दोन बंगले आणि चिकलठाणा भागातील कारखान्यावर एकाच वेळी धाड टाकली. सकाळ पासून या दोन्ही ठिकाणची कागदपत्रे, महत्वाच्या फाईली आणि बिलांची या पथकाकडून कसून तपासणी सुरू आहे.

या कारवाईत आतापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांना रोख ६२ लाख रुपये व ७ किलो सोने हाती लागल्याची माहिती आहे. या कारवाई बद्दल ईडीचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. शिवाय धाड टाकली त्या भागात व कार्यालयाच्या आसपास कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

सकाळपासून सुरू असलेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. ईडीच्या या पथकात महाराष्ट्रासह केरळ व अन्य राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अचानक झालेल्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

यापुर्वी मार्च २०१९ मध्ये शहरात अशाच प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रींगच्या संशयावरून शहराच्या जालना रोडवरली एका कार्यालयावर धाड टाकण्यात आली होती. त्यांनतर आजची ही कारवाई शहरातील दुसरी मोठी असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT