mla ambadas danve letter to cm news
mla ambadas danve letter to cm news 
राज्य

अजून बराच अनुशेष बाकी, मराठवाडा विकास महामंडळला मुदतवाढ द्या..

जगदीश पानसरे

 औरंगाबादः ज्या उद्देशाने मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती, तो हेतू अजून साध्य झालेला नाही. मरावाड्याच्या विकासाचा मोठा अनुशेष अजून बाकी आहे. त्यामुळे मराठवाडा विकास महामंडळाची मुदत संपली असली तरी, मराठवाड्याच्या हितासाठी त्याला मुदतवाढ द्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

१ मे १९९४ रोजी राज्यात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळाचा कार्यकाळा गेल्या ३० एप्रिल रोजी पुर्ण झाला. परंतु मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आणखी खूप काही करणे आवश्यक आहे, त्यासाठी हे महामंडळ कार्यान्वयित राहणे गरजेचे आहे. मराठवाडा आजही आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून राज्यातील अन्य विभागातील जिल्ह्याच्या तुलनेत मराठवाड्यातील जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे.

सातत्याने उद्भवत असलेल्या दुष्काळी व अवकाळी पावसाच्या परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरज शाश्वतरित्या भागवली जात नाही. औरंगाबाद शहरासारखे एक दोन अपवाद सोडले तर या विभागात मोठे उद्योग नाहीत, पर्यायाने रोजगाराची संधी ही तुरळकच आहेत.

प्रामुख्याने शिक्षण, पायाभूत सुविधा, सिंचन आदी क्षेत्रांचा यात समावेश आहे. शासनस्तरावर या क्षेत्रात काम केले जात असले तरी विकास मंडळाच्या माध्यमातून अनुशेष दूर करण्याचे मोठे काम होऊ शकते. त्यामुळे मुदत संपल्यावर मराठवाडा विकास मंडळ बरखास्त न करता त्याला पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे कार्यालय औरंगाबादेत आहे. गेल्या काही वर्षांत शासनाने वैधानिक हा शब्द वगळला, त्यामुळे आता मराठवाडा विकास मंडळ या नावाने हे मंडळ ओळखले जाते. विविध क्षेत्रातील मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने काय करता येईल याबद्दल राज्यपालांना शिफारस करून मराठावाड्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून घेणे व विविध यंत्रणांच्या माध्यमातून तो खर्च करून विकास साधण्याचा प्रयत्न करणे हे या मंडळाचे मुख्य काम आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे या मागणीसाठी दिवंगत गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषदेने प्रदीर्घ लढा दिला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT